पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांच्या राज्यभर विविध यात्रा सुरु आहेत. अशा परिस्थितीत संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) काम करणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केली. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रवीण गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीवेळी शेकापमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवाय लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळावं यासाठी प्रवीण गायकवाड यांनी प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना डावलून, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे प्रवीण गायकवाड नाराज होते.
आता त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम करणार असल्याचं सांगितलं. “काँग्रेसने आमची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं प्रवीण गायकवाड यांनी आजच्या बैठकीनंतर सांगितलं.
प्रवीण गायकवाड कोण आहेत?
प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील नेते आहेत. महाराष्ट्र सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी मध्यंतरी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता. मात्र, शेकापमधून बाहेर पडून, ते पुन्हा संघटनात्मक कामं करत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवीण गायकवाड यांना मानणारे लोक आहेत. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांनी आपलं नेतृत्त्व सिद्ध केले आहे. तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात प्रवीण गायकवाड यांचा समर्थक आहे.
संबंधित बातम्या
विस्ताराने बोललो तर नव्याने वाद होतील, प्रवीण गायकवाड यांचं पुण्यात घणाघाती भाषण
पुण्यातून काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने प्रवीण गायकवाड नाराज?
प्रवीण गायकवाड खर्गेंच्या भेटीला, पुण्यासाठी दिल्लीत फिल्डिंग