औरंगाबाद : औरंगाबादच्या विभागीय आढावा बैठकीत काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) तसेच भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्यात जुगलबंदी रंगली. संभाजी पाटील निलंगेकरांचे आरोप केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी होते, असा घणाघात अमित देशमुखांनी केला. अमित देशमुख यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख, देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तिघांना निवडून आणण्यासाठी तीन पक्षांचे राजकीय फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला होता. (Sambhaji Patil Nilangekar vs Amit Deshmukh in Aurangabad Meeting)
धीरज देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीणची जागा मॅनेज केली होती, या संभाजी पाटलांच्या आरोपावर उत्तर देताना ‘ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी केलेला तो आरोप होता’ अशी प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली. ‘लातूर ग्रामीणची जागा मॅनेज होती. विजयी उमेदवार हे नोटाच्या (nota) विरोधात विजयी झाले, तर पराभूत उमेदवार हेसुद्धा नोटाच्याच विरोधात पराभूत झाले’ अशा शब्दात निलंगेकरांनी प्रत्युत्तर दिलं.
“मराठवाड्याची चेष्टा करणारी बैठक”
दरम्यान, मराठवाडा विभागीय बैठकीवर संभाजी पाटील निलंगेकर यांनी घणाघाती आरोप केले. ही बैठक मराठवाड्याची चेष्टा करणारी बैठक आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात मराठवाड्याला काहीही मिळणार नाही. बैठकीत कुणालाही बोलू दिलं जात नव्हतं, राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा बोलू शकत नव्हते. ही बैठक म्हणजे फॉल्स बैठक आहे, अशा शब्दात संभाजी पाटील निलंगेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीवर गंभीर आरोप केले.
काय आहे वाद?
लातूरमधील भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गेल्या विधानसभेला प्रचंड मोठी फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी केला होता. या फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही तर खुद्द भाजपचेही नेते होते, असंही त्यांनी सुचित केलंय. म्हणजेच फडणवीस, ठाकरे, देशमुख यांनी एकत्रित येऊन राजकीय फिक्सिंग केल्याचं त्यांनी उघडपणे सांगण्याचा प्रयत्न केला.
भाजपची देशमुखांसाठी फिक्सिंग?
लातूर ग्रामीणची जागा परंपरागतपणे भाजप लढवतं. पण गेल्या विधानसभेला ती जागा भाजपानं सोडली आणि औशाची जागा स्वत:साठी घेतली. औशातून देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार उभे राहिले आणि निवडूनही आले. त्यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे आमदार बस्वराज पाटील यांचा पराभव केला. औशाची जागा परंपरागतपणे शिवसेना लढवते. दिनकर माने हे तिथं शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुखांचे पुत्र आणि मंत्री अमित देशमुखांचे बंधू धीरज देशमुख यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेने सचिन देशमुख हा फारसे परिचित नसलेला उमेदवार दिला. परिणामी लातुरात धीरज देशमुख विरुद्ध नोटा अशी लढत झाली. देशातली कदाचित ही एकमेव लढत असावी जिथं मुख्य उमेदवार विरुद्ध नोटा अशी लढत झाली असावी. (Sambhaji Patil Nilangekar vs Amit Deshmukh in Aurangabad Meeting)
काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख निवडून यावेत म्हणून शिवसेनेनं फिक्सिंग केल्याचा थेट आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. त्यासाठी फारशी ओळख नसलेला उमेदवारही दिला आणि हे सगळं वरळीसाठी सेनेनं सेटिंग केली असंही त्यांचं म्हणणं आहे. वरळीतून आदित्य ठाकरे शिवसेनेकडून निवडून आलेत हे लक्षात असावं.
अमित देशमुखांनी काँग्रेसचाच उमेदवार पाडला?
लातूर ग्रामीण आधी भाजपने सोडला, नंतर तिथे शिवसेनेने दुबळा उमेदवार दिला. परिणामी अमित देशमुखांचे बंधू धीरज निवडून आले. पण त्या बदल्यात अमित देशमुखांनी काय केलं? तर त्याचं उत्तर आहे औसा. तिथे फडणवीसांचे पीए अभिमन्यू पवारांना निवडून आणण्यासाठी अमित देशमुखांनी मदत केल्याची त्यावेळेसही उघड चर्चा होती आणि आता संभाजी पाटलांनीही ते सुचित केलंय. म्हणजे स्वत:च्या भावाच्या विजयासाठी अमित देशमुखांनी काँग्रेसचे त्यावेळेसचे आमदार आणि शिवराज पाटील चाकुरकरांचे मानसपुत्र बस्वराज पाटील यांचा पराभव करण्यात मदत केली. म्हणजे फडणवीसांच्या पीएसाठी इथं फिक्सिंग झाली असं तर संभाजी पाटलांना सुचवायचं होतं.
संबंधित बातम्या :
त्यावेळी भाजप नेते रमेश कराड शिवबंधन बांधणार होते, पण…. निलंगेकरांचा दावा
(Sambhaji Patil Nilangekar vs Amit Deshmukh in Aurangabad Meeting)