कोल्हापूर : मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या महत्वाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी आझाद मैदानावर उपोषण केलं. तेव्हा राज्य सरकारनं मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देत नेमक्या तारखाही दिल्या होती. मात्र, दीड महिना उलटूनही अद्याप सरकार कोणतीच भूमिका घेत नसल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी (Maratha Community) आज थेत मंत्रालयात ठिय्या मांडला. सामाजिक न्याय विभागाच्या (Department of Social Justice) सचिवांच्या दालनात या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. झुकेगा नही साला म्हणणाऱ्या वृद्ध महिलेला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे. मात्र, आमच्या मागण्या सोडवण्यासाठी त्यांना वेळ नाही, असा संताप या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांना विचारलं असता राज्य सरकारनं दिलेल्या तारखा पाळायला हव्यात, अशी प्रतिक्रिया देत कायदा हातात घेऊ नका, असं आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिलंय.
सरकारने दिलेल्या तारखेप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत. काहीच केलं नाही असं नाही पण काही गोष्टी पुढे गेल्या नाहीत. भावना व्यक्त करणं हा तुमचा अधिकार आणि पण कायदा हातात घेऊन कुठलीही गोष्ट करु नका. मला अजित पवार यांचा फोन आला होता. काही गोष्टी कागदोपत्री आहेत त्यावर मार्ग निघाला पाहिजे. उद्या मंत्रिमंडश बैठक झाल्यानंतर समन्वयकांशी बोलण्याचा शब्द अजित पवार यांनी दिल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिलीय.
सरकारनं आदेश दिले की त्याचं पालन करणं अधिकाऱ्यांचं काम आहे. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या अधिकाऱ्याने दूर केल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. माझी भूमिका समन्वयाची आहे. तुम्ही दिलेल्या तारखा लवकरात लवकर पाळून कार्ग काढा ही माझी अपेक्षा आहे. गोष्टी कशा मार्गी लावणार आहात ते उद्या समन्वयकांना सांगा, असं आवाहन संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केलं आहे. तसंच गरीब मराठ्यांसाठी जे मला करायचं होतं ते मी केलंय.
मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी हे आंदोलन केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आज तडक मंत्रालयात धाव घेतली आणि सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं. या विद्यार्थ्यानी जोरजोरात घोषणाबाजी करत संपूर्ण मंत्रालय दणाणून सोडलं. आमचे प्रश्न अद्याप सुटले नाही. त्यामुळे आम्ही मंत्रालयात आलो आहोत. आमच्या काही अतिरिक्त मागण्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात. संभाजीराजेंना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावीत एवढ्याच आमच्या मागण्या आहेत. त्या पूर्ण करा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इतर बातम्या :