रायगड : रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. त्यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी रायगडावर जमा झाले होते. त्यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या काही दिवसांत राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं. राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. मात्र शिवसेनेनं (Shivsena) आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्यानं संभाजीराजे यांची कोंडी झाली. अखेर त्यांना राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर आज संभाजीराजे रायगडावरुन (Raigad) काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. संभाजीराजे यांनी आज रायगडावरुन नाव न घेता शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
संभाजीराचे म्हणाले की, मागील दोन वर्षात शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानं झाला. मी तेव्हा रायगडावर येऊ नका असं आवाहन केलं होतं आणि तुम्ही माझा शब्द ऐकला. हा छत्रपतींबद्दलचा विश्वास आहे, प्रेम आहे. इथे काय सोय आहे, मात्र तरीही तुम्ही हजर असता. माझा प्रश्न सरकारला आहे की शिवभक्तांसाठी तुम्ही काय केलं? एसटी आम्हीच आणायची, पाणी आम्हीच आणायचं. जर सोय होत नसेल तर हा लढा इथूनच सुरु होईल. मग होऊन जाऊ दे, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिलाय.
आपण इथे कशासाठी आलो आहोत, जल्लोषासाठी. राजर्षी शाहूंना जाऊन 100 वर्षे झाली. ते सामाजिक सुधारक होतेच, सोबतच छत्रपतींचे नववे वंशज होते. अनेक ठिकाणी छत्रपतींचे स्मारक उभे केले होते. पुण्यात जर कुणी शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं असेल तर ते शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी ब्रिटनच्या पाहुण्यालाही शिवाजी महाराजांसमोर वाकवलं. मी किल्ल्याचं संवर्धन, जतन सुरु केलंय. राष्ट्रपतींनाही शिवाजी महाराजांसमोर आणलं, असंही संभाजीराजे म्हणाले.
राज सदर दिशा दाखवते, या सदरावर मी राजकीय बोलणार नाही. राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आरक्षण, शेतकरी, पाणी, अनेक प्रश्न आहे. हा संभाजी छत्रपती लवकरच राज्यात सर्वांना भेटायला येणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यादिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन ज्या दिवशी राज्याभिषेक झाला तो आहे. महाराजांचा इतिहास पासून आपल्याला काय घ्यायचं हे ठरवायला हवं. त्यांनी प्रस्थापितांऐवजी विस्थापितांना संधी दिली. तिकडे शिवाजी महाराजांविरोधात अनेक शाही होत्या. त्यांना अडवण्यासाठी बाप-लेकात भांडणं लावली. शहाजीराजेंवर मोठा दबाव होता तेव्हा. घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. शहाजींना आदिलशाहानं पत्र लिहिलं होतं की शिवाजी महाराजांना थांबवा नाही तर आपल्यात शामिल करुन घ्या. पण शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करण्यासाठी रान उघडं करुन दिलं. शहाजीराजेंच्या मदतीनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया उभारला. हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी कुठेही तडजोड केली नाही. या पिता-पुत्रांचं मला सांगायचं आहे. जी शिकवण मला दिली आहे ती तुम्हालाही दिली आहे. त्यामुळे वाकायचं नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, त्यांना आग्र्याला जावं लागलं. त्यांनी तो तह धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधनं घातली जातात, तिथे थांबायचं नसतं. शिवाजी महाराजांनी संघर्ष परक्यांशी केलाच पण स्वकियांशीही केला. शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे, अशा शब्दात संभाजीराजे यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली.