Samit Kadam on Anil Deshmukh : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणात समित कदम हे नाव सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी यांचा प्रस्ताव घेऊन समित कदम हे माझ्याकडे आले होते, असा दावा अनिल देशमुखांनी केला आहे. यानंतर अनिल देशमुखांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे घरगुती संबंध असल्याचा दावाही केला. आता यावर समित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुखांनी माझे देवेंद्र फडणवीसांसोबत दाखवलेले फोटो जगजाहीर आहेत. ते सतत तेच फोटो दाखवत आहेत. यातून “देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करणं हा उद्देश आहे”, असे वक्तव्य समित कदम यांनी केले. नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मी कालच याबद्दल माझं मत माध्यमांसमोर मांडलं आहे. अनिल देशमुखांनी माझे-देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले फोटो दाखवले. यात नवीन काहीच नाही. माझे फेसबुक, इन्स्टाग्रामवर यावर जे काही फोटो आहेत, तेच फोटो त्यांनी दाखवले. त्यांनी त्यात काही हेरगिरी केलेली नाही. माझे आणि फडणवीसांचे फोटो जगजाहीर आहेत. अनेक वर्तमानपत्रात आलेले आहेत.
२०१६ पासून माझा जनसुराज्यशक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे. मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे. आम्ही NDA चे घटक पक्ष झाल्यानंतर पक्षाच्या कामानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या बैठकीत निमंत्रण दिलं जातं. पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील विविध बैठकींसाठी आम्हाला बोलवलं जातं. त्यात फडणवीसांची भेट होते. त्यासोबत इतर पक्षातील नेत्यांचीही भेट होते. त्यामुळे यात काही मोठं सांगितल्यासारखं मला वाटत नाही. त्यांनी दाखवलेले फोटो हे जगजाहीर आहेत, असेही समित कदम म्हणाले.
सांगलीतील एका घटक पक्षाचा मी राज्य अध्यक्ष आहे. मला अनेक पक्षाचे नेते ओळखतात. अनिल देशमुख हे ही बाब कदाचित विसरले असावेत की ते अन्न नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून माझी आणि त्यांची ओळख आहे. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची ओळख त्यानंतर झाली. गेल्या तीन वर्षांपासून अनिल देशमुख हे गप्प राहिले. आता ते हा विषय मांडत आहे. त्यामुळे त्यांचा उद्देश देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करणं हा असल्याचे समित कदम यांनी सांगितले.