औरंगाबादः संजय राऊतांना (Sanjay Raut) आम्हाला बदनाम करण्याशिवाय दुसरं काम नाही. खोके घेतल्याचे आरोप करतात. आम्हीही तयार आहोत. एकदा त्यांनी सिद्धच करून दाखवावं, असं वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री संदीपान भूमरे यांनी केलंय. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारमधील आमदारांची 50 खोक्यांबाबत एसआयटी चौकशी करा, अशी मागणी केली आहे. त्यावपर प्रत्युत्तर देताना औरंगाबादेत संदीपान भूमरे (Sandipan Bhumre) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार आज भूमरे यांच्या हस्ते करण्यात आला. औरंगाबादेत पैठण तालुक्यातील सरपंचांचा सत्कार त्यांनी केला. येथे 35 पैकी 27 ग्रामपंचायतीवर भूमरे समर्थक सरपंच सत्तेत आले आहेत. यावेळी त्यांनी टीव्ही 9 प्रतिनिधींशी संवाद साधला.
संदीपान भूमरे म्हणाले, संजय राऊत फक्त आरोप करतात. एकदा यांनी दाखवून द्यायला पाहिजे. आमच्यावरचे आरोप सिद्ध करावेत. आमची चौकशीला तयारी आहे. संजय राऊतांकडून केवळ आमची बदनामी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतच जनता आमच्या सोबत आहे, हे दिसून आलंय. खोके हा विषय नाही, अशी प्रतिक्रिया भूमरे यांनी दिली.
संजय राऊतांवर टीका करताना भूमरे म्हणाले, ‘ त्यांना काही काम नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही कामं केले हे सांगू शकत नाही. फक्त शिंदे शिवसेनेला बदनाम करायचं हा विडा त्यांनी उचलला आहे. ठाकरे गट हा चौथ्या क्रमांकावर गेला आहे. त्यातूनच दिसतंय, जनतेचा युतीवर आणि ठाकरे गटावर किती विश्वास आहे…
एकनाथ शिंदेंवर भूखंड घोटाळ्याची कागदपत्र केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत. तो दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप आहे. त्यावर बोलताना भूमरे म्हणाले, कुठेही घोटाळा झालेला नाही. जनतेसमोर शिंदेंना बदनाम करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ५० खोक्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप करण्यात येतोय.
त्यावरून टीका करताना संजय राऊत म्हणाले, उठ सूठ एसआयटी स्थापन करायची, पोलिसांना काही कामच ठेवायचं नाही. सत्तेचा आणि यंत्रणेचा सर्रास वापर सुरु आहे.
आम्ही सर्व प्रकारच्या चौकशांना सामोरे जाणार आहोत. बदनमी हे शस्त्र वापरलं जातंय. पण शिवसेना या अग्निदिव्यातून बाहेर पडेल.