सांगली : राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या एकाच गोष्टीची चर्चा होतेय ती म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या दिलेल्या राजीनाम्याची. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांचीही पहिली प्रतिक्रिया आली आहे. सांगलीत त्या tv9 मराठीशी बोलत होत्या. शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा त्याचं मला अतिशय वाईट वाटतंय. दुःख झालंय. त्यांनी राजीनामा परत घ्यावा, असं सरोज पाटील म्हणाल्या आहेत.
शरद पवारांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचं खूप नुकसान होईलच. पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल.देशातील वातावरण गढूळ, आपण राजीनामा देऊ नका, अशी विनंती सरोज पाटील यांनी केली आहे.
शरद पवार यांनी लोकांच्या भावना ओळखाव्यात आणि आपला राजीनामा परत घ्यावा. पण दुसऱ्या बाजूने बहिणी या नात्याने असं वाटतं की शरद पवार आम्हाला खूप वर्ष हवे आहेत. त्यासाठी त्याची प्रकृती चांगली राहिली पाहिजे. ते सुदृढ असायला हवे. ते खूप वर्ष जगले पाहिजेत ही देखील आमची भावना आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
शरद पवार यांच्यासारखा दुसरा विरोधी पक्ष नेता नाही. देशातील वातावरण गढूळ असताना , अस्वस्थ असताना अचानक शरद पवारसाहेबांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पण शरद पवार हे लोकांचे नेते आहेत. लोक भावना लक्षात घेऊन शरद पवार यांनी अध्यश्रपदावरून निवृत्त होऊ नये, असं आवाहन सरोज पाटील यांनी केलं आहे.
शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार यांनीही पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक नाही. सर्व विचारांती शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलाय. शरद पवार आजचा निर्णय मागे घेतील, असं मला वाटत नाही. पुढील अध्यक्ष शरद पवार सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतील. अजित पवारांच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चा आणि राजीनाम्याचा काही संबध नाही, असं विठ्ठल मणियार म्हणाले आहेत.
पवारांच्या राजीनाम्यानंतर हा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली जात आहे. राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र या सगळ्यांच्या विरूद्ध अजित पवार यांची भूमिका आहे. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षात नाहीत, असं होत नाही. नवीन अध्यक्ष देखील पवारसाहेबांच्या मार्गदर्शनखाली काम करेल. शेवटी पवारसाहेब म्हणजे राष्ट्रवादी हे अवघा देश जाणतो. त्यामुळे त्यांचा निर्णय आपण मान्य करायला हवा, असं अजित पवार म्हणाले.