सांगोला, सांगली : शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. संजय राऊत आमच्या गटात येत असतील तर आम्ही त्याचा विचार करू, असं आमदार शहाजी बापू पाटलांनी म्हटलं आहे. शहाजीबापू पाटालांनी संजय राऊतांना थेट पक्षांतराची ऑफर दिल्याने सांगोल्यासह महाराष्ट्रात त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होतेय.
एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य मानून संजय राऊत जर आमच्या गटात येत असतील तर त्याचा आम्ही जरूर विचार करू, असं ते म्हणालेत.
आम्हा 40 आमदारांची भूमिका ही संजय राऊत या एकट्यासाठी निर्माण झालेली नव्हती. राऊतांच्या भोवतीने महाराष्ट्राचं राजकारण फिरत नाही. त्यामुळे आमची भूमिका ही शिवसेना वाढवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी होती, असं म्हणत संजय राऊतांच्या टीकेला शहाजीबापू पाटालांनी उत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नोटीस बजावली आहे, अशी माहिती आहे. त्यावर मला अद्याप नोटीस आलेली नाही. मात्र आल्यानंतर आम्ही सात दिवसात कायदेशीर बाजू मांडेन, असं शहाजीबापू म्हणालेत.
अजितदादांच्या येण्याने सत्तेत थोडाफार परिणाम असणार पण काळाच्या ओघात तो स्वीकारावा लागणार आहे, असंही ते म्हणालेत.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. अशात पक्षाला नवी उभारी देण्यासाठी शरद पवार सध्या महाराष्ट्र दौरा करणा्र आहेत. आज त्यांची नाशिकच्या येवल्यामध्ये सभा होतेय. त्यावर शहाजीबापूंनी भाष्य केलंय.
शरद पवारांच्या सभांचे परिणाम काय होईल हे आज सांगणे कठीण आहे. मात्र अजितदादासोबत आलेले आमदार आपल्या मतदारसंघात ताकदवान आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या सभांचा फार परिणाम होणार नाही. एक भावनिक युद्ध होईल आणि राजकारण आपल्या मूळ वाटेवरून चालत राहील, असं शहाजीबापू म्हणालेत.
अजितदादा मविआमध्ये होते. त्यावेळी ते प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम करत होते. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांचा आधार पण कोरोनामुळे आम्हाला उपलब्ध होत नव्हता. मात्र आता आमचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. प्रभावी नेतृत्व आणि निर्णयक्षमता त्यांच्याकडे आहे, असं ते म्हणाले.
अजितदादांच्या येण्याने आमच्या आमदारांमध्ये कुठेही नाराजी दिसली नाही. थोडाफार परिणाम असणार आहे. तो काळाच्या ओघात स्वीकारावा लागणार आहे. चार शिवसेनेचे चार भाजपचे मंत्री कमी होतील. मात्र हा व्यवहार सर्व आमदार स्वीकारतील असं मला वाटतं, असं शहाजीबापू म्हणालेत.