‘त्या ऊसतोड मजुरांच्या नेत्या नाहीत’, पंकजा मुंडेंना संघर्ष समितीकडून घरचा आहेर

| Updated on: Sep 07, 2020 | 4:17 PM

पंकजा मुंडेंना ऊसतोड कामगारांचं नेतृत्व करण्यास बीड जिल्हा संघर्ष समितीने विरोध दर्शविला आहे (Sangharsh Samiti oppose Pankaja Munde).

त्या ऊसतोड मजुरांच्या नेत्या नाहीत, पंकजा मुंडेंना संघर्ष समितीकडून घरचा आहेर
Follow us on

बीड : ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आता राजकीय पुढारी चढाओढ करताना दिसत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मजुरांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेणार असल्याचं ट्वीट केलं. आता पंकजा मुंडेंना बीड जिल्हा संघर्ष समितीने विरोध दर्शविला आहे (Sangharsh Samiti oppose Pankaja Munde). पंकजा मुंडेंच्या भेटीचा काहीही फायदा नाही. सरकारने ऊसतोडणी मजूर आणि मुकादम संघर्ष समितीच्या बीड जिल्हा सदस्यांसोबत चर्चा करावी. तसं झालं नाही, तर राज्यभरात एकही मजूर मुकादम जाऊ देणार नाही, असा थेट इशारा संघर्ष समितीने एक पत्रकार परिषद घेऊन दिलाय.

बीड जिल्हा हा ऊसतोड मजूर पुरविणारा जिल्हा म्हणून परिचित आहे. आता दसरा सणाच्या तोंडावर ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावरील राजकारणाला वेग आला आहे. आमदार सुरेश धस यांनी ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवरील निर्णयाचा चेंडू पंकजा मुंडे यांच्या दालनात टाकला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी आज ट्वीट करत मजूर मुकादमांच्या प्रश्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.

पंकजा मुंडेंच्या या भूमिकेला बीड जिल्हा संघर्ष समितीच्या सदस्यांनी विरोध केला आहे. पंकजा मुंडेंचा अनुभव कमी आहे. त्यामुळे सरकारने पंकजा मुंडेंसोबत नाही, तर बीड जिल्हा संघर्ष समितीच्या सदस्यांना घेऊन चर्चा करावी. अन्यथा राज्यातील कारखान्यासाठी एकही मजूर, गाडीवान, मुकादम पुरविणार नसल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या राजकारणाचा विषय पेटण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे, सुरेश धस यांनी आमच्या लढ्यात सहभागी व्हावे. आम्ही स्वागत करु. मात्र कोण्या एकट्या व्यक्तीने हा लढा एकतर्फी घेऊन जाऊ नये अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा संघर्ष समितीने दिलाय. त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केलाय. या पत्रकार परिषदेला प्रा. सुशीला मोराळे, प्रा. शिवराज बांगर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांची उडी, बीडमध्ये मजुरांचा मेळावा घेणार

ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आणि बीड जिल्हा संघर्ष समितीत ठिणगी पडली आहे. दुसरीकडे या मजुरांच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतलीय. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात बीडमध्ये लवकरच ऊसतोड मजुरांचा मेळावा होणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिलीय. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाबाबत आंबेडकर रिंगणात उतरणार असल्याने राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

कोयत्याला न्याय मिळेल, त्याची धार आणि सन्मानाची जबाबदारी कामगार-मुकादमावर : पंकजा मुंडे

Sangharsh Samiti oppose Pankaja Munde