नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तही आता राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. 59 वर्षाचे संजय दत्त येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या येणाऱ्या विधानसभेला गाझियाबाद येथून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष संजय दत्तला तिकीट देण्याच्या तयारीत आहे.
विशेष म्हणजे संजय दत्तने 2013 मध्ये अरशद वारसी, विवेक ऑबेरॉय, मिनिषा लांबासोबत जिल्हा गाजियाबाद या चित्रपटात काम केलं होतं. संजयने काही वर्षापूर्वी समाजवादी पार्टीमध्येही प्रवेश केला होता. मात्र जास्त काळ तो या पक्षात राहू शकला नाही. “राजकीय क्षेत्र खुप वेगळं आहे”, असं संजयने त्यावेळी म्हटलं होते.
संजय दत्तचे वडील दिवंगत सुनील दत्त काँग्रेस पक्षात होते. खासदार आणि क्रीडामंत्री म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये काम पाहिलं आहे. संजय दत्तची बहीण प्रिया दत्तही मुंबईमधून खासदार म्हणून निवडून आली होती आणि यावेळीही काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली आहे. संजय दत्त यांची आई नरगीस दत्तही 1980 मध्ये राज्यसभेत नॉमिनेट झाल्या होत्या. संजय दत्त यांनीही 2009 मध्ये समाजवादी पार्टीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये संजय दत्त यांचे नाव आल्यामुळे त्याला निवडणूक लढवता आली नाही.
संजय दत्त सध्या आपल्या कलंक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कलंक चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. करण जोहर आणि साजिद नाडियावाला चित्रपटाचे निर्माते आहेत. कलंकचा बजेट 80 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. चित्रपटात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित 22 वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. याआधी चित्रपट ‘महानता’मध्ये दोघं एकत्र दिसले होते. चित्रपटाच्या टीजर लाँच दरम्यान माधुरीसोबत काम करुन छान वाटलं, अशी प्रतिक्रियाही संजय दत्तने दिली होती. कलंकमध्ये वरुण धवन, आलिया भट, माधुरी दीक्षित, संदजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहेत.