संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत, शिंदे गटाच्या नेत्यानं फटकारलं…

| Updated on: Dec 27, 2022 | 12:44 PM

संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना गायकवाड म्हणाले, संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत. त्यांच्या लवंगी फटाक्याने कुत्रही पळत नाहीत. आम्ही तर वाघ आहोत.

संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत, शिंदे गटाच्या नेत्यानं फटकारलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड, नागपूरः संजय राऊत (Sanjay Raut) हे दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत, ते बॉम्ब काय फोडणार. सरकार पडण्याच्या त्यांच्या घोषणा या केवळ स्वप्नच राहतील, असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलंय. शिंदे-भाजप (Shinde-BJP) सरकार फेब्रुवारी महिन्यात पायउतार होईल, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. मात्र आमचं सरकार ही टर्म पूर्ण करून पुढेचीही 10-15 वर्षे कायम राहील, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.

विधानभवन परिसरात संजय गायकवाड यांनी आज टीव्ही९ शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

विधान परिषदेत काल उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सीमाप्रश्नाचा मुद्दा ठाकरेंनी लावून धरला. तर आमच्याकडे अजून खूप बॉम्ब आहेत, वातीही काढलेल्या आहेत. असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत फार तथ्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे बॉम्ब नाहीत तर लवंगी फटाके असल्याचा टोमणा फडणवीस यांनी लगावला.

आज अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी वारकऱ्यांचा वेश धारण करत भजन म्हणत सरकार विरोधात आंदोलन केलं. यावर संजय गायकवाड यांनी टीका केली.

एकिकडे देवी-देवतांचा अपमान करायचा आणि त्याच आघाडीच्या नेत्यांनी वारकऱ्यांच्या वेशभुषेत इथे यायचं, ही किती विटंबना आहे? महाराष्ट्र वेडा आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केलाय.

सरकारमधील शिंदे गटाच्या नेत्यांचीच प्रकरणं समोर येत आहेत, यामागे भाजपच्या नेत्यांचीच फूस आहे, अशी चर्चा राजकारणात आहे. यालाही संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. यात फार तथ्य नसल्याचं ते म्हणाले.

संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना गायकवाड म्हणाले, संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत. त्यांच्या लवंगी फटाक्याने कुत्रही पळत नाहीत. आम्ही तर वाघ आहोत.

त्यांच्यापेक्षा शंभर पटीने पक्षप्रवेश आमच्याकडे आहे. संजय राऊतांना सरकार पडण्याचे दिवसा स्वप्न पडतात, असा टोमणा संजय गायकवाड यांनी लगावला.