पुणे: राजकारणात गरज आणि विचारधारा या दोन गोष्टी असतात. आमच्या आणि शिवसेनेच्या विचारधारेत फरक पडला आहे. पण दिल्लीत ठरलं तर शिवसेना आणि भाजप (बीजेपी) एकत्र येऊ शकते. मनसेपेक्षा (एमएनएस) शिवसेना कधीही योग्यच राहील. सध्या आम्ही एका गटाला जवळ केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (एनसीपी) आणि शिवसेना एकत्र आली. तसंच भविष्यात भाजप, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येऊ शकतो, असं मोठं विधान भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. छोटा मासा पकडण्यापेक्षा मोठा मासा का पकडू नये, असं सूचक विधानही काकडे यांनी केलं आहे.
संजय काकडे यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी होत असल्याचं मी ऐकून आहे. बाळा नांदगावकर यांनी गिरीश बापट यांची भेट घेतल्याचं समजतं. गाठीभेटी सर्वच राजकीय पक्षात होत असतात. पण याचा अर्थ युती होईल असं मला वाटत नाही, असं संजय काकडे म्हणाले.
आम्ही पुण्यात मनसेसोबत युती करणार नाही. महाराष्ट्र लेव्हलला मनसेसोबत युती का करायची? पुणे महापालिकेत आमचे 100 नगरसेवक आहेत. मुंबईत 86 नगरसेवक आहेत. नाशिकमध्ये आम्ही नंबर वन पक्ष आहोत. नाशिक पालिकेत आमची सत्ता आहे. आमचे एवढे नगरसेवक असताना युतीची गरज काय? असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाईट टीका केली होती. लाव रे तो व्हिडिओ आणि लाव रे ती सीडी सुरू होतं. वाईट पद्धतीने टीका करणाऱ्या माणसाशी युती का करायची? मला ही युती मान्य नाही. पक्ष पातळीवर काय होईल माहीत नाही. वैयक्तिक मी म्हटलं तर युतीची आम्हाला गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मनसे सोबत युती केली तरी मते मिळणार नाहीत. मनसेही शिवसेनेची बी टीम आहे. आम्ही युतीत तिकीटं जरी दिली तरी मनसेसैनिक शिवसेनेलाच मतदान करतील. त्यामुळे अशी युती हवीच कशाला? असंही ते म्हणाले.
मी स्वत: भूमिका घेत आहे. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. पक्षालाही विनंती करणार आहे. युतीची गरज नाही. 2014ला राज ठाकरे यांनी मोदींची वाहवा केली. 2019ला टीका केली. केवळ राजकीय स्वार्थासाठी टीका केली, असं त्यांनी सांगितलं.
युतीची गरजच असेल तर पारंपारिक शिवसेना आहे. त्यांच्याकडे जाऊ. आमची सत्ता येत नाही किंवा कुठे संख्याबळ कमी पडतंय असं काही झालं तर आम्ही शिवसेनेला आवाज देऊ. पण मनसेकडे का जायचं? उद्धव ठाकरे कधीच मोदींना वाईट बोलले नाहीत. उलट राज ठाकरे अधिक वाईट बोलले आहेत. आम्ही शिवसेनेशी युती करणार नाही. पण गरज पडली तर शिवसेनेसोबत जाऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नाही. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आम्ही अनेक वर्ष एकत्रं होतो. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर प्रचंड टीका केली. आज ते एकत्र येऊ शकतात तर आम्ही का एकत्र येऊ शकत नाही? राजकारणात कोणीच शत्रू नसतो. गरज असेल तर मोठा मासा पकडू. लहान मासा का पकडायचा?, असा सवाल त्यांनी केला.
मोदींवर टीका केल्याबद्दल राज ठाकरे यांनी माफी मागावी असं मी म्हणणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. पण युती करायची असेल तर जनता आम्हाला याबाबत प्रश्न विचारेल, असं सांगतानाच गाठीभेटी होतात. पण युती होईल असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.
आमच्या कोणत्याही नेत्याने मनसेसोबत युती व्हावं म्हटलं नाही. साध्या कार्यकर्त्यानेही म्हटलं नाही. गाठीभेटी होत असतात. दिल्लीतून मनसे-भाजप युतीचा निर्णय झाला तर काही हरकत नाही. पण मी दिल्ली आणि राज्यातील नेत्यांना माझा विरोध कळवेल.