मुंबई : शिवसेना भाजपच्या सावलीतून कधीच बाहेर येणार नाही, त्यामुळे त्यांच्याशी फ्लर्ट करण्यात काहीच अर्थ नाही, असं म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्वपक्षाला घरचा आहेर (Sanjay Nirupam taunts Congress) दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास सकारात्मक विचार करण्याची तयारी दर्शवली होती.
‘माझ्या समजेनुसार शिवसेना भाजपच्या सावलीतून कधीच बाहेर येणार नाही, त्यामुळे त्यांच्याशी फ्लर्ट करण्यात काहीच अर्थ नाही. हा व्यर्थ उपद्व्याप ठरेल. राज्यातील नेत्यांना लवकरच सत्याची जाणीव होईल, अशी आशा आहे’ असं निरुपम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
‘निरुपयोगी गोष्टी करण्याऐवजी पक्षाने दोन टक्के मतं का गमावली, याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळी दोन टक्के मतं कमी झाली. 17 टक्क्यांवरुन घसरुन 15 टक्क्यांवर का आलो, याचा विचार करा. पक्ष म्हणून राज्यात तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरलो आहोत’ याची आठवणही निरुपम यांनी करुन दिली.
To the best of my understanding, #ShivSena will never ever come out of the shadow of #BJP.
So, there is no point in flirting with them.
Its going to be a futile exercise.
Hope the state leaders will realise the truth.— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 27, 2019
सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचा प्रस्ताव आला, तर विचार करु : बाळासाहेब थोरात
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या. दुसरीकडे, ‘अबकी बार 200 पार’ म्हणणाऱ्या भाजपला केवळ 105 जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेला 56 जागा जिंकता आल्या.
निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेसाठी जर शिवसेनेचा प्रस्ताव आता तर त्यावर विचार केला जाईल, असं सांगितलं. तसेच, पुढे काय करायचं आहे याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, असंही ते म्हणाले होते.
संजय निरुपम यांनी याआधीही अनेक वेळा आपल्याच पक्षातील नेत्यांना खडे बोल सुनावले (Sanjay Nirupam taunts Congress) आहेत. मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय अतिशय योग्य होता, ते जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले, असा टोला संजय निरुपम यांनी लगावला होता. निरुपम हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांचा पराभव केला होता. संजय निरुपम यांना काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देत मुंबई अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गटबाजीमुळे पक्षातील अनेक वाद चव्हाट्यावर आले होते. याच पार्श्वभूमीवर निरुपम यांना पदावरुन हटवण्यात आल्याची चर्चा होती. निरुपम यांच्या जागी मिलिंद देवरा यांची वर्णी लागली होती.