कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार झटका दिलाय. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव केलाय. त्यानंतर भाजपच्या धनंजय महाडिक यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. या विजयानं कोल्हापूर भाजपमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. मात्र, पराभवानंतर शिवसेनेचे संजय पवार आज माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना इशारा दिलाय. संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहे. मात्र, शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. मराठा मावळा हरला असे पोस्टर लावणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं संजय पवार म्हणाले.
संभाजीराजेंना इशारा देत संजय पवार म्हणाले की तुम्ही आमचे छत्रपती आहात. मात्र शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. मराठा मावळा हरल्याचे पोस्टर लावणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेनेकडे मतं मागायला तुम्ही आला होता. शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही. राज्यसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला याचा शोध वरिष्ठ घेत आहेत, असंही संजय पवार म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन आधार दिला. इथून पुढे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार काम सुरु ठेवणार, असंही संजय पवार यांनी सांगितलं.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर सहाव्या जागेसाठी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी सर्वच राजकीय पक्षाचे सहकार्यही मागितले. मात्र, शिवसेनेकडून संभाजीराजेंना पक्षप्रवेश करत शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याची ऑफर देण्यात आली. मात्र संभाजीराजे शिवसेनेच्या तिकीटावर नाही तर शिवसेना पुरस्कृत म्हणून लढण्यास तयार होते. मात्र, त्यावर निर्णय होऊ शकला नाही. शिवसेनेकडून कोल्हापूरच्याच संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शेवटी आकडेवारीचं गणित जुळत नसल्यामुळे संभाजीराजे यांनीही निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप करत जोरदार टीका केली होती. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मावळे आहेत म्हणून राजे असतात, असं वक्तव्य केलं होतं.
त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवार निवडून येणार असं संजय राऊत ठामपणे सांगत होते. मात्र, भाजपच्या धनंजय महाडिकांनी संजय पवारांचा पराभव केला. तो पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा धागा पकडत मावळा हरल्याचे पोस्टर काही भागात लावण्यात आले होते. त्यावरुच आता संजय पवार यांनी असे पोस्टर्स लागणं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.