यवतमाळ : शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आज (मंगळवार) पोहरादेवी मंदिरात दर्शनाला जाणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राठोड पहिल्यांदाच जाहीर भाषण करण्याची चिन्हं आहेत. पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Sanjay Rathod visit Poharadevi ahead of Pooja Chavan Suicide Case)
संजय राठोड सकाळी नऊ वाजता अर्णीमार्गे वाशिमकडे प्रयाण करतील. साडेअकरा वाजताच्या सुमारास ते पोहरादेवी मंदिरात पोहोचण्याचा अंदाज आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर शासकीय वाहन (क्र – MH 29 M-9731) दाखल झाले होते. राठोड यांच्या यवतमाळ वाशिम दौऱ्यात उल्लेख असलेल्या वाहनातील पोलीस गार्डही त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
पोहरादेवी मंदिरात पूजा
पोहरादेवीत आल्यावर सुरुवातीला वनमंत्री संजय राठोड जगदंबा मातेचं दर्शन घेतील. त्यानंतर पोहरादेवीतील सराव मंदिरात संजय राठोड यांच्या हस्ते पूजेचं नियोजन करण्यात आलं आहे. अशी माहिती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली. त्यासाठी संजय राठोड यांच्या घरी पूजेचं साहित्य घेऊन कर्मचारीही दाखल झाले
पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात सजावट करण्यात आली आहे. सुनील महाराज यांच्या वतीने सजावट करण्यात आली आहे. जगदंबा मंदिरात होम हवन आणि पूजेची तयारी करण्यात येत आहे.
कोरोनामुळे लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन आम्ही केलं आहे. संजय राठोड आज शक्तीप्रदर्शन करणार नाहीत, असंही महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.
पोहरादेवीत कडेकोट पोलीस बंदोबस्त
पोहरादेवीत बाँम्ब डिस्पोजल वॅन दाखल झाली असून पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. पोहरादेवीला जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेट्स लावण्याचं काम सुरु आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांकडून काळजी घेतली जात आहे.
दुपारी साडेचार वाजता संजय राठोड यांची यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना नियंत्रणाबाबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ते यवतमाळ निवासस्थानी रवाना होतील.
संजय राठोड पोहरादेवी येथे आल्यानंतर मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पोहरागडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. येथे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त 50 जणांना जमण्याची परवानगी आहे. पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला तशी नोटीसही बजावली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मार्गावर कसून तपासणी केली जात आहे.
1. संजय राठोड हे सकाळी साधारण 9 वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील.
2. सकाळी 11.30 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.
3. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.
4. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.
5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.
6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संत सेवालाल महाराजांना देशभरातील 12 कोटी जनता मानते.
संपूर्ण देशभरातील 10-12 लाख बंजारा भाविक श्री. राम नवमी यात्रेकरिता या ठिकाणी येतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात. म्हणून बंजारा समाजातील प्रत्येक नागरिकांच्या घराघरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बाबूलाल महाराजांचा फोटो लावून पोहोरादेवीची पूजा करतात.
पोहोरादेवी हे एक धार्मिक स्थळ आहे. धर्मपीठ आहे. येथून आम्ही समाजाला संदेश देतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. चांगल्या रितीरिवाज रुढी परंपरेविषयी प्रथेविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. संपूर्ण 12 कोटी जनतेची पोहरादेवीविषयी हीच भावना असते. मुस्लिम धर्मातील प्रत्येक नागरिक हजला एकदा दर्शन करायला जातात. तसेच बंजारा समाजातील व्यक्ती एकदा तरी पोहरादेवीला दर्शन करायला येतो.
संबंधित बातम्या:
PHOTO | गबरु, केक आणि बरंच काही, पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा
(Sanjay Rathod visit Poharadevi ahead of Pooja Chavan Suicide Case)