मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला (Cm Uddhav Thackeray) वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. सोबत एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे संजय राठोडांचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारण्यात येतोय. एका प्रकरणात आरोप झाल्यामुळे संजय राठोड यांना वनमंत्री पदावरून (Forest Minister) राजीनामा द्यावा लागला होता. ते खातं अजूनही रिक्त आहे. संजय राठोड हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते असल्याचेही बोललं जातं. तसेच वनमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून संजय राठोड पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याने आता पुन्हा नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग मोकळा होणार का? हेही पाहणं महत्वाचं आहे.
संजय राठोड हे बंजारा समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे मोठ्या संख्येने बंजारा मतदार त्यांच्या मागे आहेत. संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे अशा पद्धतीची ठरावही बंजारा समाजाच्या मंहतांनी करून घेतला होता. हा ठराव राम नवमीच्या दिवशी महंतांकडून पास करण्यात आला होता. एवढेच नाही तर या महतांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. या घटनेने संंपूर्ण राजकारणाचं लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हलचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
बंजारा समाजाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर संजय राठोड यांनीही तशीच सूचक प्रतिक्रिया दिली होती. तसेच बंजारा समाजाने हे आंदोलन मागे घ्यावं असं संजय राठोड यांनी सांगितलं होतं. त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना भेटीसाठी बोलवल्याचे बोलले जात आहे. बंजारा समाजासाठी काय करता येईल, त्यांच्या देवीसाठी काय करता येईल, तसेच मंत्रिमंडळात पुन्हा सामील करण्याबाबत अशा तिन्ही विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भेट नेमकी कशासासाठी आहे, हे शिवसेनेची यावर अधिकृत प्रतिक्रिया आल्यावरच कळेल. मात्र अचानक होणाऱ्या या भेटीने राजकीय चर्चांना चांगलीच हवा दिली आहे. गेल्या काही महिन्यात राठोड यांच्याविरोधात भाजपही चांगलीच आक्रमक झाल्याचेही दिसून आले आहे.
Power shortage: दलालीतील टक्केवारीसाठी आघाडीकडून कृत्रिम वीजटंचाई; माधव भांडारींकडून जोरदार हल्लाबोल