मुंबईः महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात होतं, यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मूक संमती होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलंय. चोराच्या मनात चांदणं, या म्हणीसारखं देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. त्यांच्या मनातच भीती होती. काहीतरी चुकीचं केलंय, असं त्यांना सारखं वाटत राहतं. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणीने तर त्यांना दचकून जाग येते. एवढंच नाही तर मविआच्या काळात पोलिसांनी जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी फडणवीस यांचीच इच्छा होती, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ही इच्छा का होती, याचं कारणही राऊत यांनी सांगितलंय.
मविआच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात होतं, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. त्यावरून संजय राऊत म्हणाले, फडणवीस अनेक वर्ष राजकारणात आहेत. विरोधी पक्षनेते पदावरील व्यक्तीला राजकीय आरोपीला तुरुंगात टाकण्याची शिवसेनेची नाही. भाजपची ती असू शकते. या सूडबुद्धीच्या कारवाया ही भाजपची विकृती आहे. त्यांनी या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे. अशी भीती का वाटावी?
भाजपच्या काळात आमच्या सगळ्यांचे फोन टॅप केले जात होते. हा फार मोठा गुन्हा आहे. या केससंबंधित अधिकाऱ्यांना क्लिन चीट दिली. त्याच्याविरोधातील तपास का थांबवला… यातच ती भीती आहे. तुमचं मन खातंय. चोराच्या मनात चांदणं.. अशी म्हण आहे.मविआ सरकार बरं चालत होतं. मला तुरुंगात टाकण्यात आलं तर माझ्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होईल, अशी त्यांची इच्छा होती, हेच कारण फडणवीस यांच्या आरोपांमागे आहे, असं स्पष्टीकऱण राऊत यांनी दिलंय.
महाराष्ट्रातील शिवसेना विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होत आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, ‘ सुप्रीम कोर्ट म्हणजे ईव्हीएम मशीन नाही, दावे करायला. खरं तर आमची शिवसेना शत प्रतिशत खरी आहे. ठाकरे यांची शिवसेना खरी आहे. आमचा देशाच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता आमच्या खिशात आहे, अशा गमजा कुणी मारत असेल तर ते देशाचा अपमान करत आहेत. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून न्यायाच्या अपेक्षेत आहेत.