मुंबईः राज्यातल्या प्रत्येक गावा-गावात सत्ताधाऱ्यांनी नेमलेले लोक फिरत आहेत. ते सर्वत्र फिरून माणसं विकत घेत आहेत. ग्रामसेवक, ग्रामपंचायतीतील पदाधिकारी, इतर पक्षांचे कार्यकर्ते, आमदार, खासदार… या सगळ्यांचं रेट कार्ड (Rate card) ठरलं आहे. त्यानुसार माणसं विकत घेतली जात आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. भाजप (BJP) आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊथ यांनी आज हा मुद्दा उपस्थित केला. पैशांचं अमिष दाखवून राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक विकत घेतले जात आहेत, असा त्यांचा आरोप आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाचा एवढा बेफाम वापर कधीही कुणीच पाहिला नाही. ग्रामसेवक, पदाधिकारी, आमदार, खासदार, या पदांचं एक रेटकार्ड लावलंय. कमिशन एजंट नेमले आहेत. हे गावा-गावात फिरतायत. माणसं विकत घेतायत. सत्तेतल्या भागीदारांची ही परिस्थिती आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर येत आहेत. पुण्यातील कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी भाजपची ही रणनीती आहे. मात्र संजय राऊत यांनी यावरून अमित शाह यांना सुनावलंय. ते म्हणाले, ‘ अमित शाह कुठेही गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभणार नाहीत. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तुम्ही शेवटपर्यंत अभय दिलंत. त्यांचं समर्थन केलंत, इतकच नव्हे तर जाता जाता त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला…
शिवाजी महाराज यांना मानणारा समाज त्यांना पाठिंबा देईल, असा त्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी जरूर यावं. शिवनेरीवर तुम्ही जरूर जा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशाला दिशा दिली, तो ज्या मातीत जन्मला, त्या मातीतून पवित्र गोष्टी घेऊन जाता आल्या तर जा, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.
मला अटक होणार होती, हा देवेंद्र फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशात यायचं होतं. पण त्या वेळचे मुख्यमंत्री सभ्य, सुसंस्कृत होते, असं संजय राऊत यांनी सुनावलंय. आमच्यावर खोटे खटले दाखल केलेत, धाडी घालत आहात. तेव्हा तुम्हाला प्रश्न पडत नाहीत का.. सहकाऱ्यांना असा त्रास देतात आणि तुमच्या पक्षातल्या लोकांना क्लिन चीट देतात. आमचे फोन टॅप करणाऱ्यांचे गुन्हे मागे घेता. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.