मुंबईः पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर सुरु असलेली चिखलफेक थांबवा, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकर यांच्यावरून काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच सावरकरांचे वंशज रणजित सावरकर तसेच महात्मा गांधीजी यांचे पणतू आमने सामने आले आहेत. या आरोप प्रत्यारोपामुळे महाराष्ट्र विकासाच्या मुद्द्यापासून दूर जातोय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. वीर सावरकर ब्रिटिशांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याला भाजप, मनसेने तीव्र विरोध केला. तर शिवसेनेनेदेखील या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत, अशी भूमिका मांडली. त्यानंतर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसने आतापर्यंत सावरकरांवर केलेल्या सर्व आरोपांचे खंडन कऱण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
नंतर लगेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेदेखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधी यांनी केलेले आरोप आणि सावरकरांविषयी दाखवलेलं पत्र खरं असल्याचा दावा त्यांनी केला. संजय राऊत यांनी मात्र आज या सगळ्यांचा समाचार घेतला.
ते म्हणाले, वीर सावरकर, सुभाषचंद्रबोस, पंडित जवाहरलाल नेहरू, ल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी या सगण्यांविषयी कुणी काही सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येकाचं स्थान आणि योगदान आहे. कुणीही काही बोलल्याने, लोकांच्या ज्ञानात फार बदल होणार नाही. त्यामुळे सावरकरांबाबत जो काही वाद सुरु आहे, त्यावर फार बोलू नये.
आमच्यासाठी सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, नेहरू… ज्यांनी स्वातंत्र्यचळवळीत आपल्या सुखाचा त्याग केलाय. सगळ्यांच्या मनात या नेत्यांबद्दल आदर आहे. देश निर्मितीसाठी या लोकांनी त्याग केलाय. ते लोक जिवंत नाहीत, त्यांच्याविरोधात कुणीही चिखलफेक करू नये, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
रणजित सावरकरांना उद्देशून संजय राऊत म्हणाले, ‘ कुणी सावरकरांबद्दल प्रश्न निर्माण केले म्हणून त्यांनी नेहरूंबाबत प्रश्न निर्माण करायचे… स्वतःला सावरकरांचे वंशज म्हणवणाऱ्यांनी हे थांबवायला पाहिजे. ही आपली परंपरा नाही…
स्वातंत्र्यानंतर देश विकासाच्या, विज्ञानाच्या दिशेने नेण्यास पंडित नेहरूंचं योगदान आहे. सावरकर हे विज्ञान निष्ठ होते, असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेने देश नेण्याचं काम पं. जवाहरलाल नेहरूंनी केलंय. नाही तर हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज धर्मांध राष्ट्र म्हणून पाकिस्तानची ओळख आहे. नेहरूंनी तो होऊ दिला नाही. त्यामुळे हा देश नेहरूंचा ऋणी आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.