मुंबई : संजय राऊत… राज्यसभा खासदार. सामनाचे संपादक (Saamana Editor) आणि ठाकरे गटाची धडाडती तोफ… उद्धव ठाकरेंचा आवाज म्हणून रोखठोक भूमिका मांडणाऱ्या संजय राऊतांचा (Sanjay Raut Birthday) आज वाढदिवस आहे. आधी क्राईम रिपोर्टर, सामनाचे संपादक ते राज्यसभा खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या करिअरवर एक नजर टाकूयात…
संजय राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही पत्रकारितेपासून झाली. सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. त्यानंतर राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. क्राईम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळं स्थान निर्माण केलं. या काळात त्यांनी अनेक सनसनाटी बातम्यांचं वृत्तांकन केलं. यावेळी त्यांनी अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमहाली दम दिल्याचं राऊतांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. सच्चाई नावाचं सदर ते लोकप्रभा साप्ताहिकात लिहित होते.
पुढे राऊत सामनात आले. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले. एखादी राजकीय अथवा अन्य मोठी घडामोड घडल्यास सामनाचं संपादकीय काय असणार याकडे वाचकांचं लक्ष असतं. संजय राऊत ‘रोखठोक’ शैलीत हे संपादकीय लिहीत असतात.
दरम्यानच्या काळात प्रसिद्ध मुलाखतकार प्रदीप भिडे यांनी सह्याद्री वाहिनीसाठी त्यांची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजकारणात जाणार का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. तेव्हा उत्तर देताना राऊत यांनी राजकारणाला गटार असं संबोधलं. राजकारणात जाणार का या ऐवजी तुम्ही गटारात जाणार का?, असं थेट का विचारत नाही?, असं म्हणत राऊत हसले. पुढे बोलताना मी सध्या राजकारणात जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.
राजकारणी लोक सर्वसामान्यांच्या मनातून उतरत आहेत. सध्या पैशाचं राजकारण वाढत चाललं आहे. त्या राजकारणात माझ्या सारखा सामान्य माणूस किती टिकू शकतो, याबाबत शंका आहे. त्यामुळे राजकारणापासून दोन हात दूर राहिलेलं बरं, असं राऊत या मुलाखतीत म्हणालेत.
पण पुढे 2004 ला ते राज्यसभा खासदार झाले. ते आजतागायत ते राज्यसभा सदस्य आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यातही त्यांचा महत्वपूर्ण वाटा राहिला आहे.
बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचे कौशल्य संजय राऊत यांनी आत्मसात केले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तो काळ शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. त्यावेळी सेनेची भूमिका राऊतांनी अतिशय परखडपणे मांडली.