मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा गुंता सुटता सुटत नाहीये. भाजप आणि शिवसेना आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने ‘महासेनाआघाडी’ स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. महाराष्ट्रातील या सत्तेच्या सारीपाटावरचा एक महत्त्वाचा मोहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज (15 नोव्हेंबर) वाढदिवस (Sanjay Raut Birthday Special). संजय राऊत यांनी वयाची 58 वर्ष पूर्ण केली.
सत्तेच्या वाटाघाटीत सध्या सर्वाधिक नाव चर्चेत आहे, ते संजय राऊत यांचं. अँजिओप्लास्टीमुळे संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल झाले, तसं सत्तेचं केंद्र दोन दिवसांसाठी ‘लीलावती’मध्ये शिफ्ट झालं. रक्तवाहिन्यातील ब्लॉकेजपेक्षा सत्तानाट्य त्यांना अधिक अस्वस्थ करत होतं. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तंबी देऊनही ते टीव्हीवर राजकीय घडामोडींचे अपडेट्स घेत राहिले. इतकंच काय, तर ‘सामना’चा अग्रलेख रुग्णालयातील बेडवरुन लिहिण्यावाचूनही ते स्वतःला रोखू शकले नाहीत.
भाजपशी ‘सामना’ करणारे राऊत
शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक अशा अनेक भूमिका निभावणारे संजय राऊत नेहमीच भाजपला अंगावर घेत आले आहेत. भलेही शिवसेनेने भूमिका बदलून संजय राऊतांना तोंडावर पाडलं असेल, मात्र पक्षाच्या भूमिकांसाठी ते ठाम राहिले आहेत. संजय राऊत हे आळीपाळीने विद्धान आणि पहेलवान या दोन्ही भूमिका नेटकेपणाने बजावतात. म्हणूनच मास बेस नसला, तरी राजकारणात राऊतांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे.
दिल्लीत भाजपविरोधात मोर्चेबांधणीसाठी चंद्राबाबू नायडूंपासून ममता बॅनर्जींपर्यंतच्या भेटीगाठी असो, संजय राऊत प्रत्येक आघाडीवर पुढे राहिले आहेत. शिवसेना नेते तसे फारसे इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये वावरताना दिसत नाहीत. पण शिवसेनेचा कडवटपणा कायम ठेवून सर्व पक्षांमध्ये ज्यांना सहज अॅक्सेस आहे, असा एकमेव नेता म्हणून संजय राऊतांकडेच पाहिलं जातं.
पवारांशी स्नेहावरुन टोले
संजय राऊत हे महाराष्ट्रात शिवसेनेचे आणि दिल्लीत पवारांचे स्नेही असतात, अश्या चर्चाही होतात. मात्र राऊतांच्या याच स्नेहामुळे भाजपच्या सत्तेची चव अनेकदा खारट केली आहे. म्हणूनच हिंदुत्वाआडून ठसठसीत पुढे येणारी ”मराठी अस्मिता” राऊतांच्या बोलण्यातून वारंवार जाणवते.
कधी-काळी राऊत हे राज ठाकरेंच्याही जवळचे होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या मनधरणीसाठी राऊत आणि मनोहर जोशी राज ठाकरेंच्या घरी पोहचले. मात्र तेव्हा राज ठाकरेंच्या समर्थकांनी राऊतांची गाडी पेटवून दिली. मनसेच्या स्थापनेनंतर मात्र राऊतांनी सामनातून शिवसेनेच्या भूमिकेला अजून धारदार केलं आणि हळूहळू ते उद्धव ठाकरेंच्या विश्वासातले नेते बनले. मात्र तरीही राऊतांनी मांडलेल्या भूमिकांवर अनेकदा शिवसेना नेतृत्वानं हात झटकले, हे विसरुन चालत नाही.
बाळासाहेबांचा मोहरा
राऊतांच्या अनेक अग्रलेखांनीही शिवसेनेला कोंडीत पकडल्याची उदाहरणं आहेत. बुरखाबंदीचा अग्रलेख असो, नाहीतर मग 2009 मध्ये मनसेला मिळालेल्या यशावर मराठी माणसांनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा अग्रलेख. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनीही या अग्रलेखांवर ही शिवसेनेची भूमिका नसल्याचा खुलासा केला.
‘सामना’च्या पुरवणीत छापून आलेलं एक कार्टून हे मराठा मोर्चाशी जोडलं गेलं. तेव्हा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना जाहीरपणे माफी मागावी लागली. मात्र संजय राऊत शेवटपर्यंत त्या कार्टूनचा मोर्चाशी कुठलाही संबंध नसल्याचं सांगत राहिले.
याच ‘सामना’तून संजय राऊतांची राजकीय इनिंग सुरु झाली. लोकप्रभा साप्ताहिक, लोकसत्तेत राऊतांनी बराच काळ क्राईम वार्ताहर म्हणून काम केलं. ‘गँगवॉर’ हा शब्द राऊतांनीच जन्माला घातला. मुंबई अंडरवर्ल्डशी निगडीत अनेक घटनांचे राऊत साक्षीदारही राहिले.
‘लोकसत्ता’त असतानाच माणसं पारखण्यात वाकबगार असलेल्या बाळासाहेबांच्या नजरेत संजय राऊत पडले. बाळासाहेबांनी थेट क्राईम बीट सांभाळणाऱ्या एका तरुणाला ‘सामना’चा कार्यकारी संपादक बनवलं. तेव्हा अनेक पत्रकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.
कुटुंबात रमणारे राऊत
मूळ अलिबागचे असणारे राऊत आता वयाच्या साठीत आहेत. आजही एकत्रित कुटुंब पद्धती रमणाऱ्या राऊतांना पूर्वशी आणि विदीता या दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या मुंबईतच शिक्षिका आहेत. कला शाखेचे पदवीधर असणाऱ्या राऊतांचं पत्रकारितेचं कुठलंही शिक्षण झालं नाही. मात्र सामना हे वृत्तपत्र आजही गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत ठेवण्यात राऊतांचंच योगदान आहे. सिनेमाचंही कुठलंही तंत्र ते शिकले नाहीत. मात्र बाळकडू, ठाकरे यासांरखे सिनेमे बनवल्यानंतर जॉर्ज फर्नाडिंस आणि ठाकरे सिनेमाचा सिक्वलही ते बनवतायत.
राऊतांच्या भूमिकेबाबत, त्यांच्या विधानांबाबत विरोधकांमध्ये आणि शिवसेनेतही दुमत आहे. मात्र त्यांच्या निष्ठेवर शंका घेणारा एकही नाही. सामनातलं प्रत्येक वाक्य आणि तोंडातला प्रत्येक शब्द ते शिवसेनेसाठी लिहितात आणि शिवसेनेसाठीच मांडतात, हे नाकारुन चालत नाही (Sanjay Raut Birthday Special).