मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा सूर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायम ठेवला आहे. ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी धाडस करु नये, शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा इशाराही राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद (Sanjay Raut on Shivsena CM) घेत भाजपला आव्हान दिलं.
आम्ही हवेत बोलत नाहीत, आकडे नसताना आमचं सरकार येणार हे आम्ही कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतलं, तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असं संजय राऊतांनी दंड फुगवून सांगितलं.
महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा फॉर्म्युला ठरला होता. महाराष्ट्राच्या जनतेलाच शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार भाजपने निर्णय घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले.
त्याचवेळी, बहुमत असेल तर भाजपने शपथविधी घ्यावा, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं. ‘राज्यातील नेत्यांनी निर्णय घ्यावा असं केंद्राने सांगितलं आहे, मात्र राज्यातील नेते यात अपयशी ठरले. युती आहे तर निकालाच्या दिवशीच चर्चा सुरु का केली नाही? आठवडाभर वाट का पाहिली? 24 तारखेलाच सत्ता स्थापनेच्या चर्चेला सुरुवात करायला हवी होती’ असंही संजय राऊत (Sanjay Raut on Shivsena CM) म्हणाले.
शरद पवारांसोबत बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, ही राजकीय भेट नव्हती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याकडून राजकारणाबाबत खूप काही शिकायला मिळतं, त्यांच्याकडून कृषी विषयावर चर्चा झाली, असं राऊत म्हणाले. ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
भाजपवर टीका नाही
सत्तास्थापनेचा तिढा आणि मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा होती. साहिब… मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..! असा शेर संजय राऊत यांनी ट्वीट केला होता. या ट्वीटमधून राऊत यांनी नेमका कोणावर निशाणा साधला, हे स्पष्ट होत नाही. परंतु राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आपण भाजपवर टीका केली नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
*साहिब…*
*मत पालिए, अहंकार को इतना,*
*वक़्त के सागर में कईं,*
*सिकन्दर डूब गए..!*— Sanjay Raut (@rautsanjay61) November 1, 2019