मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयूमधील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तिच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले (Sanjay Raut on Deepika Padukone). प्रश्न दीपिका, तिचा चित्रपट छपाक किंवा तान्हाजी या चित्रपटाचा नाही. प्रश्न भाजपचं सरकार असणाऱ्या राज्यांमधील गुंडगिरीचा असल्याचं मत व्यक्त केलं. कर्नाटकमध्ये तान्हाजी चित्रपट का उतरवला गेला? तिकडं कुणाचं सरकार आहे? असा प्रश्न करत राऊत यांनी भाजपशासित कर्नाटकमध्ये तान्हाजी चित्रपट उतरवल्याचा मुद्दा उपस्थित केला (Sanjay Raut on Deepika Padukone).
संजय राऊत म्हणाले, “प्रश्न दीपिका किंवा ‘तान्हाजी’चा नाही. प्रश्न या देशातील वातावरणाचा आहे. भाजपचे शासन असलेल्या राज्यात गुंडगिरीने ‘तान्हाजी’ उतरवला जातो. ‘छपाक’च्या बाबतीतही तेच घडत आहे. मात्र, हा देश या तालिबानी संस्कृतीला थारा देणार नाही. तान्हाजी आणि छपाक हे दोन्ही सिनेमा अप्रतिम आहेत. बेळगावात तानाजी बंद करणाऱ्या कर्नाटकातील भाजप सरकारकडे यांचं काय उत्तर आहे?”
या प्रकरणात अनुराग सिन्हा, शबाना आझमी, अनुराग कश्यप अशा काही मोजक्या लोकांनी भूमिका घेतली. बाकीचे कुठे आहेत? अनुपम खेर आज कुठे आहेत? सरकारच्या मंचावर असलेल्यांच्या दृष्टीने दीपिका पदुकोण कलावंत नाही का? या लोकांना बाकीचे सर्व रिकामी डबडी वाटतात काय? असाही प्रश्न राऊत यांनी विचारला.
“भाजपनं देशद्रोह्यांबरोबर सत्ता स्थापन केली त्याबद्दल तर दीपिका बोलली नाही ना?”
संजय राऊत यांनी यावेळी भाजपने जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीसोबत सत्ता स्थापन केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, “एखाद्याची भूमिका पटली नाही म्हणून भाजप त्यांना देशद्रोही कसं ठरवतं? दीपिका पदुकोणची विचारसरणी काय आहे हे मला माहिती नाही, पण मला तिचं कौतुक वाटतं. ज्या काश्मीरमध्ये भाजपनं देशद्रोह्यांबरोबर सत्ता स्थापन केली त्याबद्दल तर दीपिका बोलली नाही ना? भूमिका घेतली नाही ना? ती फक्त JNU मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटली. तिथं तिनं मूकपणे संवेदना व्यक्त केल्या, तर तिला देशद्रोही ठरवून तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका योग्य नाही.”
‘शहेनशाहच्या वेळी बाळासाहेब ठाकरे अमिताभसोबत, आज शिवसेना दीपिकासोबत’
संजय राऊत म्हणाले, “अमिताभ बच्चन काँग्रेसमध्ये होते आणि राजीव गांधी यांचे मित्र होते. म्हणून त्यावेळी त्यांचा शहेनशाह हा चित्रपट उतरवण्याचा प्रकार झाला होता. त्या घटनेच्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमिताभ बच्चन यांच्या पाठीशी उभे राहिले होते. छपाकच्या आडून बहिष्काराचं राजकारण करणं, गुंडगिरीनं चित्रपट उतरवणं म्हणजे यापेक्षा आणीबाणी सौम्य होती, असं म्हणावं लागेल.”
“आणीबाणीत चित्रपट थांबवला म्हणून गळा काढणारे आज कुठे आहेत?”
संजय राऊत यांनी भाजपवर अभिव्यक्तीच्या नावावर दुटप्पीपणा केल्याचा आरोपही केला. भाजपने आणीबाणीत ‘किस्सा कुर्सीका’ या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढला होता. आता त्यावेळी गळा काढणारे आज छपाक आणि तान्हाजीच्या वेळी कुठे आहेत? असा प्रश्न राऊत यांनी केला.
“JNU इस्लामाबादमध्ये आहे का? तेथे जाणं गुन्हा कसा?”
संजय राऊत म्हणाले, “दीपिका कुठली भूमिका घेते हे तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. JNU मध्ये जाणं हा गुन्हा आहे का? JNU इस्लामाबादमध्ये आहे का? JNU मध्ये काही गैरकृत्य घडत असेल तर समोर आणा. पण घेराबंदी, बंधनं घालून देशद्रोही ठरवून तुम्ही काय साध्य करणार आहात? अशाने देश 100 वर्षे मागे जातो आहे.”