मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे (Sanjay Raut criticize Kangana Ranaut). तसेच आपलं कंगनाशी व्यक्तिगत भांडण नाही. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो आम्ही आवाज उठवू, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. यावेळी त्यांनी कंगनाला मराठी वाचता बोलता येतं का? असा प्रश्नही विचारला. तसेच इतरांच्या ट्वीटचे अर्थ कळण्यासाठी स्वतःचं ट्वीटर खातं स्वतः वापरावं लागतं, दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे द्यायचं नसतं, असा टोलाही लगावला.
संजय राऊत म्हणाले, “हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रनौतशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. पण महाराष्ट्राच अपमान करणारा कुणीही, कितीही मोठा असो खपवून घेणार नाही. भाजपचे नेते आशिष शेलार यांचीही भूमिकाही मी वाचली त्यांनी हे अधिक जोराने म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करतात.”
“छत्रपती शिवाजी महाराज एका पक्षाचे, जातीचे नाहीत. ते देशाचे आणि महाराष्ट्राचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशाप्रकारे घाणेरड्या शब्दात टीपण्णी करत असेल तर हा विषय एका पक्षाचा राहत नाही. हा विषय शिवसेनेचा नाही. हा विषय महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचा आहे. सर्व राजकीय पक्षांचा हा विषय आहे. इथं महाराष्ट्रात राहतात, खातात-पितात त्या सर्वाचा विषय आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी या विधानाचा निषेध केलाय. मी त्यांचं अभिनंदन करतो,” असंही संजय राऊत म्हणाले.
‘इतके दिवस महाराष्ट्रात राहता, मराठी वाचता-बोलता येतं का?’
संजय राऊत म्हणाले, “इतके दिवस महाराष्ट्रात राहता, मराठी वाचता येतं का? मराठी बोलता येतं का? माझ्या ट्वीटचा अर्थ समजून घेण्यासाठी स्वतःचं अकाऊंट स्वतः वापरावं लागतं. दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे ट्विटर अकाऊंट वापरायला द्यायचं नसतं. म्हणून असे घोळ होतात. काल कंगनाबाबत राज्याचे गृहमंत्री, परिवहन मंत्री यांनी भूमिका मांडली आहे. सरकारची भूमिका त्यातून स्पष्ट होते. मी सुद्धा पक्षाची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो, त्याविरोधात आपण एकत्र आलं पाहिजे.”
संबंधित बातम्या :
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, कंगनाचा एल्गार, थोबाड फोडणार, शिवसेनेचा पलटवार
संबंधित व्हिडीओ :