मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रातील भाजपाने राज्यातील नऊ सरकारं पाडली. मात्र हे नववं सरकार त्यांच्या नाकी नऊ आणेल असा इशारा राऊत यांनी भाजपाला दिला आहे. सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. बाळासाहेबांचा आशीर्वाद असता तर तुम्ही महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री असता, असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगाला आहे. तुम्ही आज 50 आमदारांच्या गटाला मुख्यमंत्रीपद दिलं, मग 2019 साली शिवसेनेला मुख्यमंत्रीपद का नाकारण्यात आले? तेव्हाही हेच बंडखोर शिवसेनेत होतेना असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. फुटिरांना तुम्ही आज खरी शिवसेना म्हणत आहात ही तुमची ढोंगे बंद करा. बंडखोरांना एवढं भय वाटण्याचं कारण काय? खुलेपणे समोर या, खुलेपणाने संवाद साधून दाखवा असे आवाहान संजय राऊत यांनी केले आहे.
बाळासाहेबांचे आशीर्वाद असते तर आज फडणवीस हे मुख्यमंत्री बनले असते. आज भाजपाने 50 बंडखोर आमदारांच्या गटाला मुख्यमंत्रीपद दिले. 2019 मध्ये आम्ही तेच म्हणत होतो, तेव्हा तर हे बंडखोर आमदार देखील शिवसेनेतच होते. मग तेव्हा का मुख्यमंत्रीपद दिले नाही. तुम्ही आज फुटिरतावाद्यांना खरे शिवसैनिक मानत आहात ही तुमची ढोंगं बंद करा. आताचे भाजप हा अटलजींचा पक्ष राहिला नाही. तरी देखील आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देत आहोत, हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे. बंडखोर आमदारांना भय वाटण्याचे काय कारण आहे? त्यांनी समोर येऊन संवाद साधावा असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पुढे घेऊन जाऊ हीच शिवसेना पुढे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करेल, असा विश्वासही यावेळी राऊत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान याच मुद्द्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. भाजपाने आतापर्यंत नऊ राज्यातील सरकार पाडले आहेत. देशात काही अयोग्य गोष्टी घडत आहेत, त्यामुळे देशाची मान खाली जात असल्याचे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. दरम्यान सध्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोदी हैदराबादमध्ये आले होते. त्यांच्या स्वागताला देखील केसीआर गेले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.