मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरामधून बंडखोर आमदार आणि भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे. शिंदे मंत्रिमंडळात फडणवीस उपमुख्यमंत्री हाच खरा भूकंप असल्याचे म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील खोचक टोला लगावला आहे. राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील एक पर्व संपले. जेमतेम अडीच वर्षांचाच हा कालखंड, पण बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुक्त झाले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे नव्हे तर शिवसेनेतील बंडखोरांमुळे कोसळले. याच बंडखोरांनी भाजपाला राज्यसभेत मदत केली, त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. तसेच याच लोकांमुळे भाजपाचे विधान परिषदेचे सिट देखील निवडून आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे राऊत यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार कोसळले, शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केली. महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत झाले. मात्र त्यापेक्षा मोठा भूकंप 9 दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडाचे श्रेय हे मीडियाने देवेंद्र फडणवीस यांना दिले. मात्र सत्य वेगळेच होते. या बंडाचे सूत्रधार हे दिल्लीत होते. महाराष्ट्रातील भाजपाला संपूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. या चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर आता राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येणार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असाच अंदाज सर्वांनी बांधाला होता. मात्र झाले उलटेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप होता असे राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण आता आदर्श राहिले नाही. त्याची खिचडी झाली आहे. नवे सरकार सत्तेत आले, ते सुखाने नांदो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. मात्र त्यांच्या या सत्तात्यागाने राज्यातील जनता हळहळली. हेच तर उद्धव ठाकरे यांनी कमावले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, मात्र या बंडखोरीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यात भूकंप झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.