मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला असून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री (Maharashtra CM) आणि उपमुख्यमंत्री तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला ढाल तलवार ऐवजी कुलूप हीच निशाणी दिली पाहिजे, अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
केंद्रात भाजप सरकार आहे. महाराष्ट्रातही शिंदे गट आणि भाजपचे सरकार असताना केंद्र सरकारकडून सीमा प्रश्नी हस्तक्षेप का होत नाहीये? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. त्यात आता कर्नाटक सरकार सोलापूर-सांगली या महाराष्ट्राच्या जागेवर दावा सांगत आहे..
कधी नव्हे ते डांग, उमरगाव हे गुजरातचं नाव घेत आहेत… मुंबईवरतीही हल्ला सुरुच आहे.. महाराष्ट्राचे असे तुकडे करण्यासाठी ठाकरे सरकार पाडलं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना ढाल तलवार ऐवजी कुलूप ही निशाणी मिळायला पाहिजे होती. यांच्या तोंडाला कुलूप आहे. हे सरकार तंत्र-मंत्रात अडकलं आहे.
या सरकारला महाराष्ट्राविषयी अभिमान नाही. सरकार टेंडर भरून दिल्लीला आलं आहे. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे…असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय.
महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. काल शरद पवार यांनीही सांगितलं. संयमाचा कडेलोट झाला तर आम्ही बेळगावात जायला तयार आहोत..
बेळगावच्या लढ्यासाठी दिग्गजांनी आयुष्य वेचलंय. आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलंय? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारा.. हे चालणार नाही. महाराष्ट्र पेटला तर त्यासाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील.. असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
तुमच्यात हिंमत असेल तर बोलवा तुमच्या महाशक्तीला. आणि सीमावर्ती भागाला केंद्रशासित भागाचा दर्जा द्या, असं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलं.