Sanjay Raut Press Conference : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकासआघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्राला जर त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर तुम्ही महाराष्ट्राला थांबवू शकत नाही. आज फक्त तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता”, अशा शब्दात संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली.
“महाराष्ट्रात आज शिवद्रोही सरकार आहे. या विरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल. याची सुरुवात मुंबईतील जोडे मारा आंदोलनापासून होईल. ज्या पद्धतीने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि काही मंत्र्यांनी शिवरायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली. मालवणाचा जो पुतळा कोसळला हा सरळ भ्रष्टाचार आहे. आपपल्या लोकांना काम देण्यासाठी जी स्पर्धा सुरु आहे त्यातून हा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माफी मागितली असेल, हा त्यांचा प्रश्न आहे. पण माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राला जर त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर तुम्ही महाराष्ट्राला थांबवू शकत नाही. आज फक्त तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. लोकशाहीत अशाप्रकारे आंदोलन करण्याला परवानगी द्यावी लागते. जर तुम्ही ती देणार नसलात तर तुमची ही दडपशाही, झुंडशाही आहे. आज रविवार आहे आणि ज्या भागात आंदोलन होणार आहे, तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे. तरीही जर तुम्ही आंदोलनाला परवानगी देत नसाल तर तुमच्या मनात हुकूमशाही वृत्ती वाढली आहे. आम्ही फक्त जोडे मारा आंदोलन करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, हे लक्षात ठेवा, असाही घणाघात संजय राऊत यांनी केला.
आमच्या कार्यकर्त्यांच्या बस थांबवण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरु आहे. आज लोकलचा मेगाब्लॉक आहे आणि मुद्दाम तो वाढवण्यात आला आहे. आम्ही कार्यकर्त्यांना वाहनाने यायला सांगितलं. पण सकाळपासून वाहनांना अटकाव केला जात आहे. त्यांना थांबवलं जात आहे. एवढी भीती का आणि कशासाठी? तुम्ही आम्हाला आंदोलन करु देत नाहीत. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आंदोलन घ्यायचा अधिकार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले.