मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने काल पुण्यातील एका कार्यक्रमात पेट घेतला. तकर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील एका विचित्र अपघातातून बचावले. चौथ्या मजल्यावर पोहोचण्याआधी लिफ्ट धाडकन् खाली कोसळली… गेल्या काही दिवसात आमदार, खासदारांचे होत असलेले भयंकर अपघात, यामागे काही करणी वगैरे केली आहे की काय, असा सवाल लोकांच्या मनात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कुणी जादुटोणा करतंय, अशी लोकांची भावना असणे हीच पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट असल्याचं मत संपादकीयात मांडण्यात आलंय…
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अघोरी विषयांच्या चर्चांना वेळीच रोखण्यासाठी तसेच विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे, यासाठी पांडुरंगास साकडे घालावे, अशी मागणीही सामनातून करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्रात जादूटोण्याची चर्चा घडतेय, हे सामनातून निदर्शनास आणून देण्यात आलंय. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा कायदा केला, पण मिंधे-फ़णवीसांचे सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे. मंत्रालयात तसेच इतर सरकारी कार्यालयात अशीच चर्चा असल्याचं सामनातून म्हटलंय..
शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार गुवाहटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे म्हटले जाते. मुख्यमंत्री पदाच्या स्थैर्यासाठी हे बळी दिल्याचं सांगण्यात आलं.. पुन्हा त्याच मंदिरात जाऊन नवस फेडला गेला.. हे सरकार आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात, घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक जादूटोण्याची जोडत असतील तर ते बरे नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलंय.
सुप्रिया सुळे, अजित पवारांबाबत काल घडलेली गटना, विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांच्या गाडीचा भीषण अपघात, संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले, मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांना अखेरच्या काळात भयंकर आजाराला सामोरे जावे लागले.. तेव्हापासूनच सरकार पाडण्याचे प्रयोग सुरु झाले.
म्हणजे महाराष्ट्रातील करणी टोळीचे हे अघोरी प्रयोग आधीपासूनच सुरु होते, या अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला बसत आहेत.. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे.