नवी दिल्लीः भारत-चीन सीमेवर (India China) आठ दिवसांपूर्वीच चीनने घुसखोरी केली. मात्र केंद्र सरकारचा गुजरातमध्ये तेव्हा राजकीय उत्सव सुरु होता. इकडे देशाच्या सीमा उघड्या पडल्या. तवांगमध्ये (Tawang) दुश्मनाने घुसखोरी केली. देशाच्या सीमा केंद्र सरकारसाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे यावरून लक्षात येतं, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.
तर तवांगमध्ये आठ दिवसांपूर्वीच घुसखोरी झाली असताना गुजरात निवडणुकांसाठी हे सत्य लपवलं गेलं, पंतप्रधानांनी देशापासून एवढी मोठी घटना का दडवली, असा सवाल संजय राऊत यांनी केला. दिल्लीत आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी चीनच्या घुसखोरीवर भाष्य केलं.
राऊत म्हणाले, ‘ लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली, मग ते तवांगमध्ये घुसलं. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारणातलं लक्ष कमी करून देशाच्या सीमांवर लक्ष द्यावं.
चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसतोय, यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल. आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न लावून धरणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
पाकिस्तान, चीन हे देशाचे दुश्मन सीमांवरती धडका मारतायत. प्रधानमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय, हे तवांगवरून दिसून येतंय. आठ दिवसांपूर्वी ही घडना घडली, जखमी सैनिक गुवाहटीत उपचार घेत आहेत. हे का लपवलं गेलं? दोन्ही बाजूंचे सैनिक किती जखमी झाले? शहीदही झालेत का? याविषयी अधिकृत माहिती सरकार द्यायला तयार नाही…
1961 च्या चीनी सैन्य तवांगच्या पुढे आलं होतं. स्थानिकांनी चिनी सैनिकांशी युद्ध करून तवांग देशात टिकवून ठेवलंय. मात्र आज केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे भारत चीन सीमेवर तणाव वाढला आहे. तवांगची घटना ९ डिसेंबर रोजी घडली असताना आता ती का उघड झाली? या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी द्यावं, आपलं आंतरराष्ट्रीय धोरण चुकत आहे का, असा सवाल राऊत यांनी केलाय.