मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरु आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. शिवसेनेचे आमदारही सध्या हॉटेल मुक्कामी आहेत. अशा स्थितीत शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हॉटेलमध्येच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘मी इतकंच सांगतो एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याचं सूत्र शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. फार घमेंड करु नका. अगदी स्पष्ट सांगायचं तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है. ती राहणार आणि ती दिसेल’, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन… 56 वर्षापूर्वी हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक ठिणगी महाराष्ट्रात टाकली. त्या ठिणगीचा देशभरात आज वणवा पेटलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उपस्थित आहेत. मघाशी उद्धवजी जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना आठवण करुन दिली की आज फादर्स डे आहे. बाळासाहेब ठाकरे हे कोण आहेत आपले? बाळासाहेब नेहमी म्हणायचे जेव्हा फादर ऑफ नेशनअसा उल्लेख येतो तेव्हा या देशाला बाप नाही. पण फादर्स डे दिवशी मी सांगू इच्छितो की हिंदुत्वाचा आमचा बाप बाळासाहेब ठाकरे होते. या देशातील नाही तर जगात ज्याच्या मनात, रोमारोमात हिंदुत्व आहे तो प्रत्येकजण बाळासाहेबांना आपला बाप मानतो आणि बाप एकच असतो’, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी भाजपवर केलीय.
‘हिंदुत्वाचे बाप आम्ही आम्हाला का मानतो, कारण अयोध्येत आम्ही गेल्यावर जे स्वागत, जो जल्लोष पाहायला मिळाला, जे आशीर्वाद साधू संतांनी आम्हाला दिला. जेव्हा जेव्हा आदित्य ठाकरे साधू संतांपुढे झुकले, तेव्हा त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. तो आशीर्वाद आपल्या हिंदुत्वाला होता. बाळासाहेबांप्रति असलेली सदभावना होती. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, कसं आहे आणि कोणत्या दिशेनं जात आहे त्याचं कुणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही. मी इतकंच सांगेन, शिवसेनेचा 56 वा वाढदिवस आहे. अबतक 56, अजून पुढे खूप आहे. राजकारणात काही लोकांना फार घमेंड आलीय’, असा हल्लाबोलही राऊतांनी केलाय.
राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागला, ठीक आहे एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेची घालमेल सुरु आहे. मी इतकंच सांगतो एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याचं सूत्र शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. फार घमेंड करु नका. अगदी स्पष्ट सांगायचं तेरा घमंड तो चार दिन का है पगले… हमारी बादशाही तो खानदानी है. ती राहणार आणि ती दिसेल. या बादशाहीला नख लावण्याची हिंमत अजून कुणाची नाही.
संपूर्ण देश आज पेटलाय. अग्निवीर… काय असतो अग्निवीर? खरे अग्निवीर तर इथे समोर बसले आहेत. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात. सैन्यात आता कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहे. सैन्य पोटावर चालतं हे माहिती होतं, पण आता ते कंत्राटावर चालणार आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही राज्यकर्त्याने असा मुर्ख निर्णय घेतलेला नाही. ज्या देशात तुघलक होता, त्यानेही असा निर्णय घेतला नाही. पण या देशात चार वर्षाचं, तिन वर्षाचं कंत्राट! देशाची सूरक्षा कुणी करायची हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात आज देशाची सूत्र आहेत. ठेकेदार पद्धतीने गुलाम नेमले जातात, देशाचं सैन्य नाही. म्हणून अख्ख्या देशात मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात एक अराजक निर्माण झालाय. देश पेटलाय. पण महाराष्ट्र शांत आहे कारण या राज्याची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत. ती सूत्र जोवर आमच्याकडे आहेत तोवर राज्य स्थिर आणि शांत राहिल. अनेक प्रयत्न सुरु आहेत पण तुम्हाला ते जमणार नाही, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावलाय.
मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो तेव्हा ती भाजपला झोंबली होती. मी बोललो होतो की या देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होण्यास फार वेळ लागणार नाही. आणि आज देशात सुशिक्षित, तरुण वर्ग रस्त्यावर उतरलाय. शांतता प्रस्थापित करण्यासाठी बिहारमध्ये सैन्य आणावं लागलं आहे. राज्य कसं करायचं हे पाहायचं असेल तर महाराष्ट्रात या. मिस्टर फडणवीस नुसती कटकारस्थानं करुन हे राज्य चालणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन राज्य चालवावं लागणार आहे. ती क्षमता केवळ शिवसेनेच्या नेतृत्वात आहे.
हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करत आहेत ते भविष्यात शिवसेनेच्या पायाशी असतील. आम्ही ईडी-सीबीआयला घाबरत नाही. अंगावर आलात तर शिंगावर नाही तर पायाखाली तुडवले जाल इतकंच मी सांगतोत. शिवसेना ही अग्नी आहे. या अग्नीत समिधा टाकण्याचं काम खालो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करत असतात. अयोध्येला गेलो तेव्हा तिथले शिवसैनिक स्वागतासाठी सज्ज होते. बाळासाहेबांचे नातू येत आहेत, हिंदुत्वाचा भगवा ज्यांनी डौलानं फडकवत ठेवला आहे. त्यांचे नातू वारस येत आहेत म्हणल्यावर तिथे स्वागतासाठी लखनऊपासून अयोध्यापर्यंत सगळे उभे होते, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.