दिनेश दुखंडे, मुंबईः पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक पोलिसांवर काही दबाव आहे का, याची चौकशी करा, अशी मागणी आम्ही केली. यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांना अस्वस्थता का वाटावी, ते अस्वस्थ असतील तर ताबडतोब त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. नारायण राणे यांची सध्या मानसिक अवस्था ठिक नाही. ते वारंवार खोटे दावे करत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला कितीही लहान म्हटलं तरी आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, अशी भूमिकाही संजय राऊत यांनी मांडली. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला सोमवारी एका कारचालकाने जोरदार धडक दिली. या घटनेत वारिसे यांचा मृत्यू झाला.
कारचालक पंढरीनाथ आंबरकर याला पोलिसांनी अटक केली असून हा नारायण राणे यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, ‘ आधी सीबीआय, ईडी चौकशी मागे लावत होते. आता थेट हत्याच करायला लागले. सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे.जिल्हा स्तरावर पोलिसांवर दबाव असू शकतो. स्थानिक नेते सहभागी असतील, असा संशय व्यक्त केला जातोय.
नाणारच्या आसपास प्रकल्प येणार म्हणून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली. ते कोण आहेत? शेवटी त्यांचा आवाज बंद होत नाहीत, हे पाहून त्यांची हत्या करण्यात आली. ती थरारक आहे. राजकीय हत्या आहे. पैशावाल्यांनी केलेली हत्या आहे. प्रबळ लोकांच्या गुंतवणुकीला याचा विरोध होता, म्हणून त्याची हत्या झाली, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सदर प्रकरणातील आरोपीचा फोटो शेअर केलाय. यामागे नेमकी काय भूमिका आहे, असा सवाल केला असता राऊत म्हणाले, ‘ किती चतुर आरोपी आहे, हे सांगण्यासाठी मी फोटो शेअर केला. महाराष्ट्रात जे सुरु आहे, ते सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालतं. तेच सरकार आणण्याला मदत करत होतं.
संजय राऊत यांच्या आऱोपांना मी किंमत देत नाही, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय. यावरून राऊत यांनी उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ राणे इतके मोठे नेते आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे. फ्रान्स, लंडन इतर ठिकाणचे राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार होऊ शकतात.
दोन वेळा शिवसेनेने त्यांचा पराभव केला आहे. राणे यांची मानसिक अवस्था पाहता, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. आम्ही कोण आहोत, हे महाराष्ट्र सांगू शकतो. चौकशीचा ससेमिरा लावल्याने पक्ष बदलणारे आम्ही नाहीत.
शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही केली. यावरून केंद्रीय मंत्र्यांना अस्वस्थता वाटत असेल तर त्यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली पाहिजे. आम्ही हत्ये प्रकरणी चौकशीची मागणी केली असता तुम्ही का घाबरता? कोर्टात दावा दाखल होईल.माझ्या खासदारकीवरूनही हे खोटं बोललं आहेत. आता कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.