चंदन पुजाधिकारी , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मालेगाव | 2 डिसेंबर 2023 : दादा भुसे यांना अजून काय पुरावे पाहिजे? पूर्ण नागडा झालाय. पुरावे म्हणजे काय? कसले पुरावे? आम्ही हिशोब मागतोय. आम्हाला कुठे पुरावे मागता? शेतकरी रस्त्यावर आहेत. त्यांच्याकडे पावत्या आहेत. कसले पुरावे मागता? असा सवाल करतानाच तुरुंगात जायची तयारी ठेवा, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांना दिला आहे. तसेच अद्वैय हिरे यांचं कुटुंब शिवसेनेसोबत आल्यापासून कारवाया सुरू झाल्या. मी कालच प्रशांतदादा हिरे यांना भेटलो. त्यांच्या कुटुंबाला भेटलो. संपूर्ण शिवसेना हिरे कुटुंबाच्या पाठी आहे. आम्ही त्यांच्या लढाईत दोन पावलं पुढे आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
दादा भुसे बदनामी प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहिले. यावेळी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलून संजय राऊत यांना दिलासा दिला. आपसात वाद मिटवण्याचा सल्लाही कोर्टाने राऊत यांना दिला. पण राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली. अद्वैय हिरे यांना तुरुंगात टाकण्यामागचं कारण राजकीय असल्याचा दावाही त्यांनी केला.
मालेगावचा एक योद्धा तुरुंगात आहे. अद्वैय हिरे. मी इथे आहे. पाच सहा महिन्यांपूर्वीच शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं होतं. अद्वैय हिरे तेव्हा होते. आता तुरुंगात आहेत. राजकीय सूडाची कारवाई यालाच म्हणतात. बँकेच्या एका कर्जप्रकरणात सरकारच्या दबावात त्यांना अटक झाली, असं संजय राऊत म्हणाले.
ईडी, ईडब्ल्यूओ सर्वांना मी पत्र लिहिलं आहे. गिरणा मौसम सहकारी कारखान्यासाठी दादा भुसे यांनी 178 कोटी रुपये जमा केले. त्याचा हिशोब द्या. शेकडो पावत्या आहेत. त्याकाळातील ही रक्कम आहे. आम्ही हा हिशोब मागतो तो गुन्हा आहे का? चोराला चोर म्हणण्याचा अधिकार घटनेने दिला. हे पैसे मनी लाँड्रिंग केले का? आम्ही का घाबरतो का? पळतो का? आम्ही घाबरत नाही. नोटीस आली की पळत नाही इतर पक्षात. आम्ही लढवय्ये आहोत. आम्ही लढणारच. आम्ही इथेच आहोत, असं राऊत यांनी ठणकावलं.
ही ठिणगी पडली आहे. वणवा पेटेल. संजय राऊत यांनी कधीच कुणाची माफी मागितली नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. सत्य हे सत्य असेल तर माफी कसली? पुरावा आहे. सरकार रस्त्यावर उतरला आहे. माफी कुणाची मागायची. दादा भुसे यांनी माफी मागावी. आम्ही जे जे पुरावे दिले त्या सर्वांची 2024ला सर्व दखल घेतली जाईल. ईडी, पोलीस, सीबीआय हे सर्व स्यूमोटो दखल घेतील. आम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरजही पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.