संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग कारवाईवरून मोठी अपडेट, आज संध्याकाळपर्यंत….

| Updated on: Mar 03, 2023 | 11:32 AM

संजय राऊत यांनी नोटिशीला लेखी उत्तर दिलं नाही तर काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग कारवाईवरून मोठी अपडेट, आज संध्याकाळपर्यंत....
Image Credit source: social media
Follow us on

दिनेश दुखंडे, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)यांच्याविरोधातील हक्कभंग नोटीशीवरून मोठी अपडेट हाती आली आहे. विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. हा समस्त विधिमंडळाचा, महाराष्ट्राचा अपमान असल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.विधानसभा अध्यक्षांनी संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. यानुसार संजय राऊत यांना बुधवारीच नोटीस देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आजपर्यंत मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

संध्याकाळपर्यंत मुदत

संजय राऊत यांना आज संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत हक्कभंगासंबंधी नोटिशीला उत्तर द्यावं लागणार आहे. ही नोटीस त्यांना बुधवारीच पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. आज त्यांना देण्यात आलेली दोन दिवसांची मुदत संपतेय. निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सोमवारी यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत.

कारवाईपूर्वी….

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई होईल का, झालीच तर ती कोणत्या स्वरुपाची असेल यावरून चर्चा सुरु झाली आहे. यादरम्यान, एक मोठी अपडेट हाती आली आहे. संजय राऊत हे राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याआधी संसदीय समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत सध्या ठाकरे गटाच्या पक्षाच्या शिवगर्जना मोहिमेवर आहेत. कालपर्यंत ते कोल्हापुरात होते. तर आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे आहेत. कराडमध्ये आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ मी नोटीस वाचलेली नाही. नोटीस घरी जाईन, कार्यालयात जाईन तेव्हा पाहीन. मी सध्या बाहेर आहे. एवढ्या घाईने उत्तर देता येत नाही. कायद्याचं राज्य असल्याने कायदेशीर उत्तर द्यावं लागेल. त्याला वेळ लागतो…

फासावर लटकवता का?

संजय राऊत यांनी चोर या वक्तव्यावरून आज पुन्हा ठाम वक्तव्य केलं. सगळेच त्यांना चोर म्हणत आहेत. आमच्या पक्षातून फुटून जे निघाले, त्या विशिष्ट गटाला मी चोर म्हटलं. बच्चू कडू यांना अडवून त्यांना चोर म्हटलं गेलं. असं संजय राऊत यांनी सांगतानाच मला काय फासावर लटकवायचं तर लटकवा. तेवढंच बाकी आहे. तुरुंगात टाकून झालं, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

मुदत वाढ मिळणार नाही?

अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. १ मार्च रोजी संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी संजय राऊत यांच्याविरोधात ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यात नोटिशीत उल्लेख आहे की ३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत लेखी खुलासा करावा, असंही नोटिशीत सांगण्यात आलंय. तसेच यात मुदतवाढ मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आलाय.

हक्कभंग समितीची आज बैठक

संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून आज हक्कभंग समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक आहे. संजय राऊत यांनी नोटिशीला लेखी उत्तर दिलं नाही तर काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय या बैठकीत घेतला जाईल.