शिर्डी : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झालं तर नवल वाटू देऊ नका, असं वक्तव्य करुन खळबळ उडवून दिलीय. राऊतांच्या या दाव्याला आता भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं आहे. भाजप नेते आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राऊतांवर खोचक टीका केलीय. संजय राऊतांना झोप लागत नाही. त्यांना झोपेच्या गोळ्या (Sleeping Pills) घ्याव्या लागतात, असा टोला बावनकुळेंनी लगावलाय. तसंच महाराष्ट्राच्या विकासाला निधी लागणार असल्यानं एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केलाय.
संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, संजय राऊतांना झोप लागत नाही. त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आमदार, खासदार मंत्रालयात गेले नाहीत तर त्यांच्या भागाचा विकास होईल का? महाराष्ट्राच्या विकासाला निधी लागणार असल्यानं एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. महाविकास आघाडीने अडीच वर्षे सत्यानाश केला. आम्हाला आता 20 – 20 खेळून पाच वर्षाचा विकास दोन वर्षात करायचा आहे, त्यासाठी केंद्राची मदत लागणार आहे. तुम्हाला कधी विश्वास दिसला नाही त्यामुळे तुम्ही दिल्लीत गेले नाहीत. शिंदे-फडणवीसांची दिल्ली वारी केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी असल्याचं बावनकुळे म्हणाले.
संजय राऊत यांनी राज्यात पुन्हा सत्तांतर होईल, आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केलाय. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, तुमचं अपयश झाकण्यासाठी आमदार संपर्कात असलेल्या वावड्या उठवतात. शिंदेंनी मागेच सांगितलं की यातला जो यायला तयार असेल त्याला घेऊन जा. मात्र, तुमच्यासोबत कुणी यायला तर पाहिजे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आता आत्मचिंतनाची वेळ आलीय. चुका सुधारण्याऐवजी आमदारांबद्दल अपशब्द बोलता. त्यामुळे राहिलेले आमदारही निघून जातील. शेवटी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि त्यांचे बंधू इतकेच राहतील. 40 आमदार, 12 खासदार सोडून चालले तरी तुम्ही मुजोरी करताय. महाराष्ट्र आता तुमच्या मुजोरीला कंटाळलाय, अशा शब्दात बावनकुळे यांनी ठाकरे आणि राऊतांवर टीका केलीय.
बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरही टीका केलीय. त्यांना आपलं दु:ख सांगायचं असेल तर ते देशातील मीडियाला बोलावून सांगावं. सामन्याचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर तुम्हीच. प्रश्नही ठरलेले, उत्तर ठरलेले. ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावलाय.