संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील कथित घोटाळ्या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रथमच दिल्लीत दाखल झाले आहेत. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी लवकरच अमित शहा, नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. त्यानंतर आज 22 नोव्हेंबर रोजी ते दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीत आलो असल्याचं संजय राऊत म्हणाले.
मुंबईत गेल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत आल्यानंतर मी त्यांना भेटेन. पण लपून वगैरे भेटणार नाही, तुम्हाला सांगून भेटेल, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी माध्यमांना दिली.
या भेटीचं नेमकं कारण काय असेल, हे सांगताना राऊत म्हणाले, मला तुरुंग प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या गृहमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडायच्या आहेत. जेलमध्ये असताना मी काही अभ्यास केलाय, त्यातील नेमके मुद्दे घेऊन मी फडणवीसांशी चर्चा करणार आहे… विरोधी पक्षातले असलो तरी आम्ही सहकारी आहोत. मी खासदार आहे. त्यामुळे आम्ही कधीही भेटू शकतो. असं राऊत यांनी म्हटलं.
ईडीच्या आरोपांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, अन्याय असत्याविरोधात लढायचं असेल तर त्याची मानसिक तयारी आमची सर्वांची आहे. सगळेच पळकुटे नसतात. काही लढणारे असतात. म्हणून महाराष्ट्र टिकून राहिला आणि देशात स्वातंत्र्याची मशाल पेटत राहिली आहे, असं वक्तव्य संजय राऊत म्हणाले.
सीमा प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी शिंदे यांना टोला मारला. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हेसुद्धा युती शासनाच्या काळात बेळगावसंदर्भात विषयाचे मंत्री होते. चंद्रकांत पाटीलही होते. पण हे दोन्ही मंत्री किती वेळा बेळगावात गेले… मी वारंवार सांगत होतो, जा म्हणून… आता तुम्ही असे काय दिवे लावणार आहात? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.