मुंबई : ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांवर निशाणा साधलाय. शिंदेगटाच्या नेत्यांमध्ये जराही स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांच्यातील शिवसैनिक मेला आहे. शिंदेगट भाजपत विलिन झालाय, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
शिवरायांचा अपमान हा सर्वात मोठा अपमान आहे. महाराष्ट्र आणि देशाचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरु होतो आणि तिथेच संपतो.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं विधान भाजपला मान्य आहे का हे भाजपने स्पष्ट करावं, असं संजय राऊत म्हणालेत.
शिंदेगट ही एक टोळी आहे आणि टोळीला अस्तित्व नसतं.टोळी ही गँगवॉरमध्ये मारली जाते किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारली जाते. मुंबईतील गँगवॉरचा इतिहास माहिती आहे. टोळ्या नाहीशा होतात. त्यांचं अस्तित्व राहत नाही. शिंदेगट ही टोळी आहे. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाबाबत प्रश्न चिन्ह आहे, असं राऊत म्हणालेत.
शिंदेगटातील नेत्यांमध्ये कुठलाही स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांना शिवसेना आणि भाजपची युती करायची होती, हे मान्य. पण ते आता स्वत:चा गट भाजपमध्ये विलिन करत आहेत. या उलट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवेसना महाराष्ट्रासाठी, इथल्या प्रश्नांसाठी आणि हिंदुत्वासाठी लढत आहे. इथून पुढेही लढत राहील, असं राऊतांनी म्हटलं आहे.
इतर राज्यांना भुगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. राज्यपाल कोश्यारी यांना जर तो इतिहास मान्य नसेल तर विरोधी पक्षाने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर आधी भाजपने उत्तर द्यावं, असं राऊत म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाचा मुद्दा अर्धवट सोडून इतर मुद्द्यांकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आधी या प्रश्नावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं राऊत म्हणालेत.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी औरंगाबादचं नामकरण धर्मवीर संभाजीनगर करावं, अशी मागणी केली आहे.त्यावर विचारलं असता, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालेलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा निर्णय झालेला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.