मुंबई : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यांच्या या कृतीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) यांनी या गुवाहाटी दौऱ्यावर टीका केलीय.”खोके सरकार आणि आसामचं नातं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
कामाख्या देवी ही न्याय देणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. 40 आमदार तिकडे गेलेत. आम्हाला आशा आहे की, कामाख्या देवी महाराष्ट्राला न्याय देईल, असंही राऊत म्हणालेत.
आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिस्वा शर्मा आधी काँग्रेसमध्ये होते. तेही पक्षांतर करून भाजपत आले आणि मुख्यमंत्री झाले. आपले मुख्यमंत्रीही तसेच मुख्यमंत्री झालेत. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून ते भाजपसोबत गेले. मुख्यमंत्री झाले. त्यामुळे दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं जमलं असेल, असं राऊत म्हणालेत.
हिमंत बिस्वा शर्मा यांनी एकनाथ शिंदे आणि आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला बोलावून घेतलं. आम्हाला त्यांनी कधी बोलावलं नाही, कारण आम्ही पक्षांतर केलं नाही, असंही राऊत म्हणालेत.
दरम्यान या गुवाहाटी दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांची भेट झाली. त्याचे फोटो एकनाथ शिंदेंनी शेअर केले आहेत. “आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटी येथे सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासह आसाम सरकारच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहा सहकारी मंत्रीदेखील उपस्थित होते. आसाम आणि महाराष्ट्र राज्यातील उद्योग, व्यापार, दळणवळण, पर्यटन आणि परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावेत तसेच महाराष्ट्रात आसाम भवन आणि आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारून दोन्ही राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जवळ यावीत याबाबत देखील या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय.