मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असणाऱ्या रेशीमबाग इथे गेले होते. तिथे त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावरून ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीका केली.
#नागपूर शहरातील रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात उपस्थित राहून संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतींना विनम्रतापूर्वक अभिवादन केले. pic.twitter.com/6EN2IPnEEp
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 29, 2022
“आधी एकनाथ शिंदे यांचं पक्षांतर झालं होतं. आता तर रक्तांतरही झाल्याचं दिसतंय. संघ विचारांचा रेशीम किडा एकनाथ शिंदेंच्या मनात वळवळतोय”, अशी टीका राऊतांनी केली आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल राडा झाला. शिंदेगटाने या कार्यालयावर ताबा मिळवला. त्यावरही राऊत बोललेत. शिंदेगट घुसखोरच आहे. त्यांना स्वत:चं अस्तित्व नाही.ते इकडे-तिकडे कुठेही घुसत असतात. त्यांच्या हातात सत्ता आहे. ही झुंडशाही आणि मस्तवालपणा सत्तेमुळेच आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या, मग दाखवतो. काल शिवसैनिकांनी दाखवलं ना. काल शिवसैनिक गेले. त्यांनी दाखवून दिलं. गद्दारांची एक पद्धत आहेत. गद्दार कुठेही घुसतात, असं राऊतांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काही सूत्रे हलवत असतील तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकायला पाहिजेत. एक दिवस भाजपवाले तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात घुसतील तर ते तुम्हाला कळणारही नाही. मी वैयक्तिक आरोप करत नाही. पण हेच नरेश म्हस्के शिंदेंना आवरा म्हणून रोज मातोश्रीवर येत होते. ते आता काय सांगत आहेत? ज्यांना पदं दिली ते बेईमान आणि गद्दार निघाले, असं राऊत म्हणालेत.
शिवसेना भवनावर ताबा मिळवण्याची भाषा करणाऱ्यांचे बाप आले पाहिजेत. त्यांचा एक बाप असेल तर येईल. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? सेनाभवन बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलं. सेना भवन आमचं होतं, आहे आणि राहणार, असं राऊत म्हणालेत.