Sanjay raut on Chief Minister post : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. त्यातच आता महाविकासआघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन धुसफूस सुरु असल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीच, असे विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यानंतर नाना पटोलेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन विचार करण्याची गरज नाही, असे म्हटले. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केले.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, याबद्दल नाना पटोलेंना विचारले होते. तेव्हा हे विधान जर शरद पवार किंवा स्वत: उद्धव ठाकरेंनी केले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ. अन्यथा आम्हाला याबद्दल विचार करण्याची गरज नाही, असे नाना पटोलेंनी म्हटले होते. नाना पटोले यांच्या या विधानाबद्दल संजय राऊतांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी नाना पटोले हे आमचे मित्र, मी त्यांची अडचण समजू शकतो, असे वक्तव्य केले.
“मी २०१९ साली उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे मीच म्हणालो होतो. नाना पटोले यांनी केलेले विधान हे बरोबरचं आहे. महाविकासआघाडीचाच मुख्यमंत्री होईल, हे त्यांचे वाक्य बरोबर आहे. पण त्यांच्यासमोर जर काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदासाठीचा वेगळा चेहरा असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे. माझी यात काहीही अडचण नाही. काँग्रेसमध्ये जर मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा असेल आणि त्यांनी जर तो सांगितला तर आम्ही त्या चेहऱ्याचे नक्कीच स्वागत करु. नाना पटोले हे आमचे मित्र आहेत. त्यांची अडचण मी समजू शकतो. इतरांचीही अडचण मी समजू शकतो”, असे संजय राऊत म्हणाले.
“मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याबद्दल बोलत आहे. महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे, त्याबद्दल बोलत आहे. मी नाना पटोले यांच्या मनात कोणता चेहरा आहे, त्याबद्दल बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे, याबद्दल बोलण्याचा मला नक्की अधिकार आहे. काँग्रेसने त्यांच्याकडे चेहरा आहे, हे स्पष्टपणे सांगावे. काँग्रेसने आमच्याकडे हे १० चेहरे मुख्यमंत्रिपदासाठी आहेत, हे त्यांनी सांगावे. त्यातील आम्ही एक निवडू”, असेही संजय राऊतांनी म्हटले.