मुंबई : गेल्या तीन आठवड्यावरुन अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने मागे हटायला तयार नाहीत तर सरकारने आणखी अंतिम तोडगा काढलेला नाही. अशातच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील गुरुद्वारा रकीबगंज येथे जाऊन गुरु तेगबहादूर यांच्या समाधीपुढे माथा टेकवला. शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वारेत गेल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. यावरुनच राऊतांनी अग्रलेख लिहित जोरदार बॅटिंग केली आहे. (Sanjay raut On narendra Modi And Delhi Farmer protest over Saamana Editorial)
“दिल्लीतील रकीबगंज गुरुद्वारात पंतप्रधान मोदी अचानक गेले. गुरू तेगबहादूर यांच्या समाधीपुढे त्यांनी माथे टेकवले. यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? मोदी यांनी कोणतीही कृती केली तरी ते नाटक किंवा ढोंगच आहे, असे मानून विरोधक टीका करतात. हे काही योग्य नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अनेकदा मंदिर, मशीद, गुरुद्वारात गेल्याच आहेत. ईदचा शिरकुर्मा आणि बिर्याणी तर अनेकांनी चापली आहे, पण मोदी यांच्याबाबतीत विरोधक वेगळी भूमिका घेतात याचे आश्चर्य वाटत असल्याचं राऊत म्हणाले.
“मोदी गुरुद्वारात गेले त्यामागे राजकारण आहे. शिखांविषयी इतकेच प्रेम होते तर पंजाबच्या शेतकऱ्यांना एक महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर का उभे केले आहे? शिखांच्या अन्नधान्याचे, पोटापाण्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत व शिखांच्या गुरूंसमोर नतमस्तक व्हायचे, हे नाटक आहे,’ असे विरोधक म्हणत असतीलही, पण मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये”, असं मतंही राऊत यांनी व्यक्त केलंय.
“शिखांच्या शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वारा रकीबगंज येथे पोहोचले तरी दिल्लीच्या सीमेवरील पंजाबचा शेतकरी विचलित झाला नाही. त्याचा संघर्ष, त्याचा लढा सुरूच राहिला. त्यामुळे रकीबगंज गुरुद्वारात मोदी गेले, हा त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेचाच भाग मानावा”, असं मतंही राऊतांनी व्यक्त केलंय.
संजय राऊत यांनी अग्रलेखाच्या सरतेशेवटी मोदींवर खोचक टीका केलीय. राऊत म्हणाले, मोदी हे अचानक रकीबगंज गुरुद्वारात पोहोचले. त्याच वेळी तेथे जी ‘गुरुवाणी’ सुरू होती, त्याचा थोडक्यात सारांश असा-
तुम्ही सेवा करता. ईश्वराची भक्ती करता. करीतही असाल, पण तुमचे विचार बदलले नाहीत तर त्या सेवेचा, भक्तीचा काय उपयोग? तुम्ही धर्मग्रंथांची अनेक पारायणे केली, परंतु त्यातील उपदेश, शिकवणूक तुम्ही समजून घेतली नाही, त्याचा अंगीकार मानवतेच्या कल्याणासाठी केलाच नाही तर धर्मग्रंथांच्या त्या पारायणांचा काय उपयोग? अशा वेळी जेव्हा तुमची ‘वेळ’ येईल, तुमच्या कर्मांचा ‘हिशोब’ होईल त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठे तोंड लपविणार? काळापासून कोणीही स्वतःचा बचाव करू शकलेले नाही आणि करू शकणार नाही, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा!
(Sanjay raut On narendra Modi And Delhi Farmer protest over Saamana Editorial)
संबंधित बातम्या
Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट