मुंबई : राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ही चर्चा योग्य नसून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत गेलेल्या राऊतांनी राजधानीतूनही पत्रकार परिषद घेण्याचा शिरस्ता (Sanjay Raut on NCP CM) कायम ठेवला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली. या बैठकीत काय झालं, त्याबाबत मी बोलणार नाही. त्यांनी काही निर्णय घेतल्याचं मला समजलं. त्यावेळी माझ्याशी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांनी फोनवरुन चर्चा केली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मी शरद पवारांना भेटणार आहे, पण सोनिया गांधींना इतक्यात भेटण्याचं प्रयोजन नसल्याचंही राऊतांनी सांगितलं.
मुंबईत तिन्ही पक्षांची म्हणजे महासेनाआघाडीची बैठक होणार आहे. डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेलं दिसेल. एक डिसेंबरच्या आधी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्म एकत्र घेऊन राज्याची स्थापना केली. शिवसेनेला कोणीही सेक्युलरिजम शिकवू नये. न्यायालयात धर्माच्या पुस्तकाऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घ्या, असं सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशातील पहिले नेते, असं सांगत संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा पुरस्कार केला.
शिवसेनेच्या तीन खासदारांच्या जागा बदलण्यामागे राजकीय दबाव आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद दिल्लीत जरुर उमटावेत, मात्र पवित्र अशा संसदेच्या सदनात उमटता कामा नयेत, यासाठी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना
आसनव्यवस्था पूर्ववत करण्यासंदर्भात पत्र लिहिलं, असं राऊतांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी भेटण्यात नवल काय? शरद पवारांनी मोदींची भेट
घेतल्यामागे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही संजय राऊत म्हणाले. शरद पवारांनी काल मोदींची पंतप्रधान
कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागाची माहिती (Sanjay Raut on NCP CM) दिली.