ईडीची भीती बंद, आता राष्ट्रपतींची धमकी सुरु, पण राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत : संजय राऊत

| Updated on: Nov 02, 2019 | 10:13 AM

जर सत्तास्थापनेला विलंब झाला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा इशारा मुनगंटीवारांनी दिला होता. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं.

ईडीची भीती बंद, आता राष्ट्रपतींची धमकी सुरु, पण राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत : संजय राऊत
Follow us on

मुंबई : “राष्ट्रपती राजवटीचा धमकी हा महाजनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणी व्यक्ती नाही. ते देशाचे एक स्तंभ आहेत. राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा घालू नका. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही, त्यांचा मान ठेवा”, असा घणाघाती पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Presidential rule in Maharashtra) यांनी भाजपवर केला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नियम दाखवत, जर सत्तास्थापनेला विलंब झाला तर राज्यात राष्ट्रपती राजवट (Sanjay Raut on Presidential rule in Maharashtra) लागू होईल, असा इशारा दिला होता. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं.

सुधीर मुनगंटीवारांच्या राष्ट्रपती राजवटीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी टीका केली. सरकारमधील नेत्याने अशाप्रकारचं वक्तव्य करणे अत्यंत चुकीचं आहे. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही. संसदीय लोकशाहीचे नियम आणि पेच आम्हालाही कळतात, तेव्हा राष्ट्रपती राजवटीची भाषा का होते?  राष्ट्रपतींना या गोंधळात आणून त्यांच्या पदाचा अपमान करु नये. राष्ट्रपती व्यक्ती नाही देशाचा मुख्य स्तंभ आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

सत्ता स्थापनेला विलंब होणे हे काही नवीन नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नये, तुमचे सर्व कारस्थान अपयशी ठरल्यामुळे ते अशी भाषा करत आहेत, हे नवनिर्वाचित आमदारांना घाबरवण्यासाठी आहे का, मराठी माणूस याला घाबरत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राची स्थिती पाहता,सर्वच पक्ष एकमेकांशी चर्चा करत आहेत, फक्त शिवसेना आणि भाजप वगळता. मुहूर्त काढून सत्ता होत असेल तर मला आनंद आहे, पण सत्ता स्थापनेचा मुहूर्त असायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांची सत्ता स्थापन होईल, त्याला कुणीही रोखू शकत नाही. शरद पवारांची विरोधपक्षाची भूमिका योग्यच आहे. चर्चा सुरु झाली होती, हे चुकीचं आहे, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.

आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या संधीपर्यंत युतीधर्म पाळणार आहोत. आम्हाला ईडीची भीती दाखवून काहीही अर्थ नाही, असे प्रयोग अयशस्वी होतील. ईडीची भीती बंद, आता राष्ट्रपतीची भीती दाखवणार, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.

सरकार स्थापन करण्यास विलंब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कुणी जर सरकार स्थापन करणार असेल तर त्याने 145 चा आकडा दाखवावा. बहुमताचा मुहूर्त महत्वाचा आहे. कुणीही जर 145 ची यादी घेऊन जाणार असेल तर त्यांचं सरकार स्थापन होईल, असं संजय राऊत म्हणाले.