मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन सावरकरांविषयीचे त्यांचे गैरसमज दूर करावेत, त्यांना अनुवादित पुस्तक भेट द्यावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Rahul Gandhi Sawarkar Statement) यांनी दिला आहे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.
‘सावरकरांसारखा त्याग करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. वीर सावरकरांबद्दल मनमोहन सिंह यांनीही दोन महिन्यांपूर्वी वक्तव्य केलं होतं. सावरकरांच्या विचारांबद्दल मतभेद असूही शकतात, सावरकरांची विचारधारा, भूमिका पटत नसतीलही, पण त्यांनी केलेला त्याग हा मोलाचा आहे, हे मनमोहन सिंह यांनी मान्य केलं होतं. स्वतः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर टपाल तिकीट त्या काळी काढलं होतं’, अशी आठवणही संजय राऊत यांनी करुन दिली होती.
‘जेव्हा पंडित नेहरुंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते बोलतात तेव्हा आम्ही नेहरुंच्या बाजूने उभे राहतो. कारण स्वातंत्र्य चळवळीत नेहरुंचं योगदान आहे, महात्मा गांधीचं आहे, सरदार वल्लभ भाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचंही आहे. त्याच पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही राहणार. सावरकर हे स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान याचं दुसरं नाव आहे. आजही तरुणांना सावरकरांमुळे प्रेरणा मिळते’, असं राऊत म्हणाले.
वीर सावरकारांचा विषय हा स्वतंत्र आहे. एखादा नेता कोणाविषयी काय बोलतो, यावर हे सरकार टिकणार की नाही, हे अवलंबून नाही. सरकार अन्न वस्त्र निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, इन्फ्रास्ट्रक्चर या प्रमुख विषयांवर काम करत आहे, असंही राऊतांनी सांगितलं.
भाजपला सावरकरांविषयी पुळका आहे, हे ढोंग आहे. साडेपाच वर्ष केंद्रात तुमचं सरकार आहे. मी सतत वीर सावरकारांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, अशी मागणी करतोय. पण तुम्ही काय केलं? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. मुंबईतील समुद्र तिरावरील सावरकरांचं स्मारक हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने आणि सहभगामुळे झालं, एवढंच मी सांगू शकतो, असंही
राऊत पुढे म्हणाले.
मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे : राहुल गांधी
राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी एकामागून एक ट्वीट करत काँग्रेसला इशारा दिला होता.
विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे.
सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा.इथे तडजोड नाहीत.
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2019
आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2019
सावरकर माने तेज
सावरकर माने त्याग
सावरकर माने तप ,
सावरकर माने तत्व …
अटल बिहारी वाजपेयी— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2019
काय म्हणाले होते राहुल गांधी?
‘मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही’, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला होता. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात ‘मेक इन इंडिया’ नसून ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा भाजपकडून लोकसभेत निषेध करण्यात आला होता. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली होती. यावर राहुल गांधींनी प्रत्युत्तर देताना सावरकरांविषयी वक्तव्य केलं.
Sanjay Raut on Rahul Gandhi Sawarkar Statement