मुंबई : जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते, ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्या यांच्यातील शांतता हतबलताच दाखवत आहे, हे असेच सुरु राहिले, तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, अशी भीती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. (Sanjay Raut on State Government Ministers)
महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही ,असे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगितले तेव्हा त्याने एक मिश्कील भाष्य केले. “मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही, तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? कोरोनामुळे आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्क आहे.” असं संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोक सदरात लिहिलं आहे.
“मागेल त्याला काम ही आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा आहे, पण त्यासाठी काम सुरु व्हायला हवे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात ‘कोरोना’ लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्या यांच्यातील शांतता हतबलताच दाखवत आहे. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल” असं संजय राऊत म्हणाले.
घरातून काम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल, असा इशारा ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांनी दिला आहे. तो खरा मानला तर ‘कोरोना’ काळात राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला हे जाणवू लागले आहे. लोकांनी विरोधकांना घरी बसवले आणि संकटकाळात ते सरकारविरोधात काम करत आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील केसांना काळा कलप लावून अंगणातील रणांगणात उतरणार का? : सामना https://t.co/tfqWro3PjX @rautsanjay61 @ChDadaPatil @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020