मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. शिवसेना भवनावरील या पत्रकार परिषदेसाठी मोठ्या संख्येनं शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तर शिवसेना भवनाबाहेर शेकडोंच्या संख्येनं शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. या पत्रकार परिषदेत राऊतांनी भाजप नेत्यांवर अगदी शेलक्या शब्दात हल्ला चढवला. इतकंच नाही तर राऊतांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya), सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कालच्या पत्रकार परिषदेतील राऊत यांची आक्रमकता पाहता त्यांनी आता भाजपविरोधात लढण्याचा चंगच बांधल्याचं दिसून आलं. मात्र, पत्रकार परिषद संपल्यानंतर संजय राऊत आणि अनिल देसाई (Anil Desai) यांचा संवाद माईकमध्ये रेकॉर्ड झाला. या संवादाचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
पत्रकार परिषदेत राऊतांनी किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेते आणि अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी संजय राऊत प्रचंड आक्रमक झाले होते. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर संतप्त भावनाही दिसून येत होत्या. भाजप नेत्यांवर टीका करुन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी प्रश्नोत्तर करणं टाळलं आणि ते उठून उभे राहिले. त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना ठीक झालं का? असं विचारलं. तेव्हा राहुल शेवाळे यांच्यासह इतरांनी छान छान असं उत्तर राऊतांना दिलं. तर खासदार विनायक राऊत यांनी या बाजूने बाहेर पडा असं संजय राऊतांना सांगितलं. त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राऊतांना घाम पुसण्यासाठी टिशू दिला. तर शेवाळे यांनी राऊतांना कोटाला अडवलेला माईक तसाच राहिल्याची आठवण करुन दिली. संजय राऊतांनी तो माईक काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो काढता आला नाही. तेव्हा महापौरांनी सेफ्टी पिनने तो लावला असल्याचं सांगितलं. राऊतांनीही मग माईक कसा काढणार असं विचारलं आणि अनिल देसाईंकडे वळाले. राऊतांनी त्यांना ओके झालं का? असं विचारलं. तेव्हा हो एकदम मस्त झालं, परफेक्ट झाल्याचं देसाईंनी सांगितलं. तसंच आता यापेक्षा जास्त बोलायचं नाही, बास झालं, असंही देसाई म्हणाले. तेव्हा राऊतांनी त्यावर हो भरत नो क्वेशन अॅन्सर असं म्हणाले. तेव्हा विनायक राऊतही म्हणाले की बास झालं, प्रश्नोत्तराची गरज नाही आता, असं म्हटलं. हा संपूर्ण संवाद माध्यमांच्या माईकमध्ये मात्र रेकॉर्ड झाला आणि तो आता चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला, भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलं आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. राऊतांच्या या कृतीवर आता सर्व स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. राऊतांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे द्यायला हवी होती, असं मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. तर नारायण राणेंनीही आज पत्रकार परिषद संपल्यानंतर मी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देणं टाळत नाही म्हणत राऊतांना टोला लगावला.
इतर बातम्या :