मुंबईः शिवसेनेतील (Shivsena) बंडाची कुणकुण आम्हाला होती. याबद्दल आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना सूचित केलं होतं. असा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. अजित दादांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनीही दुजोरा दिलाय. काही लोकांच्या दिल्लीत वाऱ्या वाढल्या होत्या. रात्रीच्या अंधारात भेटी गाठी सुरु होत्या. याची माहिती आम्हालाही होती. उद्धव ठाकरे यांना आम्ही त्याची कल्पनाही दिली होती. मात्र आपल्या शिवसैनिकांवर त्यांचा जास्त विश्वास होता. शेवटी विश्वासू लोकांनीच विश्वासघात केला, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मुंबईत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘ अजित पवारांनी वारंवार सांगितलं आहे. उद्धव ठाकरे हे गाफील राहिले म्हटल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला, असं म्हणता येईल. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होत असतो. अजितदादा पवारांनाही ते माहिती आहे. पण आम्हीही या सगळ्या हालचाली उद्धवजींना सांगत होतो. सुगावा सगळ्यांनाच लागला होता. तरीही हे विश्वासाचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणत होते..
पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ विधान परिषदेच्या पाच निवडणुका झाल्या. तिथेही उमेदवार दिला होता. पण मविआ असल्याने शिवसेनेने वारंवार त्यागाची भूमिका ठेवली आहे. आपल्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होऊ नये, असा उद्देश आहे. सगळ्यांचा राजकीय शत्रू एकच आहे. विधान परिषदेत आम्ही आमच्यातील एकिमुळे विजय मिळवला.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह आहे. तरीही मविआ म्हणून आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. जिंकण्याची संधी जास्त कुणाला आहे, यावरून ठरवलं आहे. आमच्यात मतभेद, रस्सीखेच नाही. मविआ जिंकणं हेच ध्येय आहे, असं राऊत यांनी ठामपणे सांगितलं.
कोकणातल्या भराडी देवीच्या जत्रेनिमित्त सिंधुदुर्गात भाजप शक्ति प्रदर्शन करत आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र भाजप तेथे पैशांचं प्रदर्शन करत आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, ती कोकणातली भराडी देवी आहे. आयुष्यभर तिने शिवसेनेलाच आशीर्वाद दिला आहे. शिवसेनेचा जन्म कोकणातून झाला आहे. भराडी देवीचा पाठिंबा असता तर तो कालच्या निवडणुकीत दिसला असता.. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. पैशाचे खेळ करून देवस्थानं आणि श्रद्धास्थानं ताब्यात घेता येत नाहीत… अशा शब्दात त्यांनी भाजपाला सुनावलं.