मुंबईः स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचं (Congress) महत्त्वाचं योगदान आहे, मात्र भाजपचं काहीही बलिदान नाही, या मल्लिकार्जुन खरगेंच्या (Mallikarjun Kharge) वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही दुजोरा दिला. किंबहुना भारताचा इतिहास पाहता काँग्रेसच्या बलिदानाकडे कुणी दुर्लक्ष करूच शकत नाही. ते एक सत्य आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तुम्ही नवे दावे करू शकता, नवी पुस्तकं बदलू शकतात, पण इतिहास बदलू शकत नाहीत. आज भाजप सत्तेत आहे, त्यामुळे पुस्तकात नवी पानं समाविष्ट करू शकता पण उद्या काँग्रेस आल्यावर हे दावे नष्टही करता येतात, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसचं योगदान हे एक सत्य आहे. इतिहासात देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात सुरुवातीपासून काँग्रेसचं योगदान, नेतृत्व आहे.
काँग्रेससोबत आमचे मतभेद असू शकतात. पण लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, बाबू गेनू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान मान्य करावच लागतं.
या देशातल्या जनतेला जागृत करण्यासाठी नेतृत्वाचं काम काँग्रेसच्याच प्रमुख नेत्यांनी केलंय. दिल्लीची सूरत, संसदभवन, राजपथाचं नाव तुम्ही बदलू शकतात. पण इतिहास बदलू शकत नाहीत. स्वातंत्र्यलढ्यात तुमचं योगदान असेल तर ते तुम्ही दाखवून दिलं पाहिजे.
सत्तेवर नाही म्हणून त्यांचा इतिहास पुसला जाईल, असं होत नाही… तुमची सत्ता जाईल तेव्हा तुम्ही लिहिलेला इतिहासही पुसला जाईल. स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहासच ज्यांना नाही , ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला. अलवर येथे भाषण करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी प्राणांची आहुती दिली.
आमच्या पक्षाच्या नेत्यांनी प्राण दिले, तुमच्या पक्षाने काय केलं? तुमच्या घरात देशासाठी कुत्रा तरी मेलाय का? कुणी काही बलिदान दिलंय का?
चीनच्या हल्ल्यांवर आम्हाला चर्चा करायची आहे, पण सरकार त्यासाठी तयार नाही. सरकार केवळ सिंहासारख्या गर्जना करतं, पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे वर्तन करते. आम्ही देशासोबत आहोत, पण सरकार आमच्यापासून काहीतरी लपवत आहे, असा आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केलाय.