चिंचवडची जागा ठाकरे गट लढणार, शिवसेनेच्या बैठकीत काय ठरलं? संजय राऊतांनी सांगितलं…

| Updated on: Jan 25, 2023 | 3:25 PM

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी भाजपाच्या बैठका सुरु आहेत. तर ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

चिंचवडची जागा ठाकरे गट लढणार, शिवसेनेच्या बैठकीत काय ठरलं? संजय राऊतांनी सांगितलं...
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही जागा कोण-कोण लढणार यावरून घमासान सुरु आहे. एकिकडे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात भाजपाची (BJP) बैठक झाली तर महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत. शिवसेना भवनात आज ठाकरे गटाची याच विषयावरून महत्त्वाची बैठक पार पडली. पिंपरी चिंचवडची जागा ठाकरे गटच लढणार, असा आमचा आग्रह असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी या बैठकीनंतर केलंय. कसब्यातील जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी, पण चिंचवडला ठाकरे गटाचाच उमेदवार उभा राहणार, असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना भवनात पार पडलेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्रात दोन पोट निवडणुका आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपाच्या आमदाराचं दुःखद निधन झालेलं आहे. शिवसेनेचा आग्रह आहे, चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी.

चिंचवडच्या मतदारांचाही तो हट्ट आहे. काल रात्री विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे हे मातोश्रीवर आले होते. आमच्यात चर्चा झाली. आम्ही आमची भूमिका मांडली. कसब्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने लढावी. चिंचवडची शिवसेनेने लढावी.

मागच्या निवडणुकीत राहुल कलाटे हे शिवसेनेचे पदाधिकारी विद्यमान महापालिकेचे गटनेते निवडणूक लढले होते. त्यांनी चांगली झुंज दिली होती. लाखांच्यावर मतं घेतली होती. यावेळीही आम्ही निवडणूक जिंकू…

महाविकास आघाडीत गोंधळ?

पिंपरी चिंचवडची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी की शिवसेना लढणार, यावरून महाविकास आघाडीत अजून संभ्रम आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, अजित दादांचं काही म्हणणं होतं. आम्ही ऐकून घेतलं. पण चिंचवडची जागा आम्ही लढावी, असं मत मांडल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदेखील चिंचवड येथील जागेसाठी आग्रही असल्याचं दिसून येतंय.

26 फेब्रुवारी रोजी मतदान…

पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांची काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. हे दोन्ही आमदार भाजपाचे होते. येत्या 26 फेब्रुवारी रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे.

भाजपाचे उमेदवार कोण?

दरम्यान, कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी भाजपाच्या बैठका सुरु आहेत. आजच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाची कोअर कमिटी, पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून उमेदवारीसंदर्भात निर्णय होत असतो. दिल्लीतून ही उमेदवारी जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कसब्यातून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक तर चिंचवडमधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांनाही उमेदवारी देण्याची चर्चा आहे.