कणकवली : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा असेल, हा निर्णय निवडणूक आयोगाने (Election commission) दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेना पक्ष शिंदे यांचा म्हटल्यावर शिवसेना भवनासह प्रत्येक जिल्हा, गावा-गावातील शिवसेनेची कार्यालयं, तिथली प्रॉपर्टी एकनाथ शिंदे यांची अर्थात शिवसेनेची होणार हे निश्चित मानलं जातंय. आता उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक कुठे बसणार, पुढील रणनीती कशी ठरवणार, यावरून अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. संजय राऊत यांनी यावरून ठणकावून सांगितलंय. शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. शिवसैनिक तिथेच बसतील. तिथेच बसून काम पाहतील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरलेलं तंत्र आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ देशातली राज्यशकट फक्त शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरलं आहे. एवढा धसका यांनी घेतला आहे. या भीतीतून आणि सूडभावनेतून केलेलं हे कृत्या आहे. हे लोकशाही मार्गाने केलेलं कृत्य नाही. लोकशाहीच्या नावाने चाललेला राजकीय हिंसाचार आहे. जनता हे सहन करणार नाही.
आहे त्या परिस्थितीत निवडणूक घ्यायची हिंमत नव्हती. म्हणून तुम्ही आयोगाचा गळा दाबून हा निर्णय घ्यायला भाग पाडला आहे. निवडणूका घ्या, शिवसेना कुणाची हा फैसला जनतेला करू द्या, असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय.
महाराष्ट्रातल्या जनतेत कालपासून एक भावनिक वातावरण निर्माण झालंय. चीड आणि संताप आहे. राज्यात पश्चिम बंगालसारखा निकाल लागण्याची खात्री देतो. प. बंगालमध्ये मोदी-शहा- त्यांच्या पक्षाने पश्चिम बंगालच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि वणवा पेटला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी खेळ केलाय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
उद्धव ठाकरे यांनी काल ना मर्द शब्द वापरला. ते मर्द होते तर स्वतःचा पक्ष घेऊन लढायला हवं होतं. भाजपने हा खेळ सुरु केला. त्यातले हे पात्र. मिंधे गट आणि शिवसेना अशी लढाई नाही. मिंधे गटामागे असलेली सो कॉल्ड महाशक्ती विरुद्ध शिवसेना अशी आहे.
ज्या पद्धतीचं सूडाचं राजकारण सुरु आहे. त्यावर विश्वास ठेवतो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे अशा प्रकारच्या घटनात्मक पदावर नेमून हवे तसे निर्णय मिळवायचे, याला मी नियतीचा फेरा मानत नाही. राज्यपाल असतील, राजभवन, इलेक्शन कमिशन, न्यायव्यवस्था असेल.. तिथे ही कळसूत्री बाहुली आहे. तुम्हाला हवे ते निर्णय मिळवता. या देशात लोकशाहीचं अस्तित्व राहिलेला नाही. हा निर्णय झालेला असला तरी आम्ही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेपवणार, तडफेनं झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. काळाच्या पोटात काय दडलंय, हे कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.